www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गेल्या काही वर्षांत मुंबई सुसाट सुटलीय. मुंबईतले वेगवेगळे प्रकल्प आणि वेगवेगळे मार्ग यामुळे मुंबईची गती वाढलीय. कशी बदलली मुंबई. एक रिपोर्ट.
ही मुंबई १८ व्या शतकातली. त्यावेळी ट्रामच्या पावलानी चालणारी मुंबई १९ व्या शतकात धावायला लागली आणि पाहता पाहता सुपरफास्ट झाली. मुळात वेग हा मुंबईचा स्थायीभाव. आर्थिक राजधानी म्हणून मिरवताना पायाभूत सुविधांमध्ये मागं राहणं मुंबईला परवडणारं नव्हतं. नव्वदच्या दशकात मुंबईत फ्लायओव्हर्स झाले आणि मुंबईनं सुपरफास्ट होण्याकडे पहिला गिअर टाकला.
गेल्या काही वर्षांत तर मुंबईचं रुपडं इतकं पालटलं की जगाला तिची दखल घ्यायला लागली. त्याचा पहिला मानकरी आणि माईलस्टोन ठरला तो वांद्रे - वरळी मुंबई सी लिंक. 5.6 किलोमीटरच्या या सी लिंकमुळे वांद्रे ते वरळी प्रवास विदाऊट सिग्नल आणि ट्रॅफिक जॅममधून मुक्त झाला. फेसाळणा-या समुद्राच्या लाटांवरुन वांद्रे ते वरळी प्रवास मुंबईकरांसाठी एक भन्नाट अनुभव ठरला.
गेल्या दोन वर्षांत मुंबई पाहता पाहता वेगवान झाली. १३ जून २०१३ मध्ये ईस्टर्न फ्री वेचा पहिला टप्पा चेंबूर ते सीएसटी खुला झाला आणि हा प्रवास अवघ्या २० मिनिटांत शक्य झाला. त्याचंच पुढचं पाऊल होतं ते चेंबूर-सांताक्रूझ लिंक रोडचं.मुंबईतला हा पहिला डबल डेकर लिंक रोड. पश्चिम उपनगरं आणि नवी पूर्व उपनगरांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा. पश्चिम उपनगरांतून नवी मुंबईला जाणं या लिंक रोडमुळे अत्यंत सोयीस्कर झालं. मुंबईच्या लँडमार्कमध्ये आणखी एका झगमगत्या लँडमार्कची नोंद झाली.
एअरपोर्टच्या टर्मिनल टूचं ११ जानेवारी २०१४ मध्ये उदघाटन झालं. आणि डोळे दिपवणा-या या टर्मिनस टूकडे जाणारा रस्ताही चकाचक झाला. एरवी ट्रॅफिक जाममधून एअरपोर्टकडे वैतागून जाणारा मुंबईकर आता या नव्या रस्त्यावरुन सुसाट जाऊ लागला. मुंबईला वाहतुकीच्या बाबतीत आणखी उंचीवर नेऊन ठेवणारी मोनो १ फेब्रुवारी २०१४ पासून सुरू झाली. वडाळा ते चेंबूर हा पहिला टप्पा सुरू झाला आणि मोनोच्या प्रवासासाठी मुंबईकरांच्या उड्या पडल्या. व़डाळा ते चेंबूर हा प्रवास २० मिनिटांत व्हायला लागला.
मोनोच्या आगमनानंतर सगळ्यांचे डोळे लागले होते ते मेट्रो कधी सुरू होणार त्याकडे. अखेर अनेक डेडलाईन पार करत मेट्रो ८ जून २०१४ ला मेट्रो प्रत्यक्ष धावताना मुंबईकरांनी पाहिली. फक्त १० रुपयांतला गारेगार प्रवास करण्यासाठी मुंबईकरांची झुंबड उडाली. वर्सोवा ते घाटकोपर हा प्रवास फक्त २० मिनिटांत शक्य झाला.
आता ईस्टर्न फ्री वे आणि खेरवाडी जंक्शन फ्लायओव्हर हे दोन नवे मार्ग मुंबईकरांसाठी खुले झालेत. आता मुंबई आणखी वेगानं धावेल आणि मुंबईकरांना आता ऑफिसला उशिरा पोहचण्यासाठीच्या सबबीही कदाचित कमी होतील.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.