www.24taas.com, सांगली
ऊस दरवाढीच्या मुद्यावरून शिवसेनेनं पुकारलेला बंद मागे घेतलाय. ‘मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानं आपण बंद मागे घेत आहोत’, असं म्हणत शिवसेना बॅकफूटवर गेलीय.
ऊस दरवाढीच्या आंदोलनात उडी घेत शिवसेनेनं सोमवारी बंदची भूमिका जाहीर केली होती. सांगलीतल्या गोळीबाराचा शिवसेनेनं निषेध करत बुधवारी १४ नोव्हेंबर रोजी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्हा बंदची हाक शिवसेनेनं दिली होती. त्यामुळे आधीच हिंसक वळण घेतलेलं आंदोलन ऐन दिवाळीत आणखी चिघळणार की काय? अशी भीती निर्माण झाली होती. पण, आता मात्र शिवसेनेनं बंदच्या भूमिकेवर यूटर्न घेतलाय. ऊसाला चार हजार रुपयांचा भाव देण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेनं मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानं तूर्तास बंद मागे घेतल्याचं सांगितलंय.
दरम्यान, शेतकरी संघटना उद्या कराड इथल्या मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर चटणी-भाकरी खाऊन आंदोलन करणार असल्याचं संघटनेचे अध्यक्ष घुनाथदादा पाटील यांनी सांगितलं.