www.24taas.com, कोल्हापूर
उसाला पहिला हप्ता 3 हजार रुपये मिळावा यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राहुरीमध्ये `रास्ता रोको` आंदोलन केलं. कार्यकर्त्यांनी अहमदनगर- मनमाड मार्ग रोखून धरला होता. पहिल्या हप्त्याचा निर्णय दोन दिवसात घेतला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला. तसंच श्रीरामपूरमध्ये खंडकरी शेतकऱ्यांना जमीन वाटपाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारा कार्यक्रम उळळून लावण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी दिलाय.
याचबरोबर केंद्रीय कोळसा राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचे बंधू विशाल पाटील यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. उसाचा थकित हप्ता मिळावा आणि यंदा 3000 रुपये उचल देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. विशाल पाटील यांच्या गाडीवर नेमका हल्ला कोणी केला, हे समजू शकले नसले, तरी आंदोलक शेतक-यांनीच हे कृत्य केलं असण्याची शक्यता आहे....
साखर कारखानदारांनी सांगली,सातारा, कोल्हापूर पट्ट्यात ऊसाला 3 हजार रुपये उचल देण्याचा निर्णय घेतला. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांना हा निर्णय अमान्य आहे. ऊसाचा पहिला हप्ता तीन हजार रुपयेच मिळाला पाहिजे, यावर ते ठाम आहेत. उद्या यासाठी त्यांनी राज्यभर `चक्काजाम` आंदोलन करण्याचा इशारा दिलाय.