www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईतील मतदानाच्या तोंडावर सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये नव्याच वादाला तोंड फुटलंय... कॉलेजच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना मेल पाठवून तसंच अधिकृत वेबसाइटवरून कुणाला मतदान करायचं, याबाबतचा राजकीय सल्ला दिलाय. त्यामुळं झेवियर्सच्या प्राचार्यांनी स्वतःवर नसती आफत ओढवून घेतलीय.
मुंबईतलं प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित सेंट झेवियर्स कॉलेज... या कॉलेजचे प्राचार्य डॉ. फ्रेझर मस्करन्स यांनी कॉलेजच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या वादग्रस्त राजकीय संदेशावरुन खळबळ उडालीय. गुजरातचा विकास खोटा असून धर्मनिरपेश राहून मतदान करा, असा उपदेशाचा डोस डॉ. मस्करन्स यांनी आपल्या विद्यार्थ्यांना पाजलाय...
सध्या सत्तेवर येऊ पाहणाऱ्या जातीयवादी शक्ती या लोकशाहीस सर्वात मोठा धोका आहेत. गुजरातने प्रगती केल्याचं बोललं जातं. मात्र मानवी विकासाच्या दृष्टीनं गुजरातचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. त्यामुळं भारतीयांसाठी जादूची कांडी फिरवणारा कुणी येणार नाही. जो कोणी निवडाल, त्याची विचारपूर्वक निवड करा, असा सल्ला डॉ. मस्करन्स यांनी दिलाय.
भाजपनं डॉ. फ्रेझर यांच्या या आवाहनाला आक्षेप घेत, निवडणूक आयोगाकडे तक्रार केलीय. काँग्रेसने मात्र डॉ. फ्रेझर यांची बाजू घेत नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केलीय. प्राचार्यांच्या आवाहनावरून झेवियर्सच्या विद्यार्थ्यांमध्येच दोन गट पडलेत. काहींनी त्यांना समर्थन दिलंय, तर काहींनी विरोध केलाय.
मतदानाच्या एक दिवस आधी सेंट झेवियर्ससारख्या नावाजलेल्या शिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी असं स्टेटमेंट करणं योग्य आहे का, अशी चर्चा यानिमित्तानं रंगलीय... सेंट झेवियर्स कॉलेजचे प्राचार्य मतदानाआधी पूर्वग्रहदुषित राजकीय सल्ला विद्यार्थ्यांना कसा देऊ शकतात? निवडणूक आयोग आता याबाबत काही कारवाई करणार का? असे प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतात.
दरम्यान, सेंट झेवियर्स कॉलेजच्या प्राचार्यांनी केलेल्या वादग्रस्त आवाहनानंतर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होतायत. मात्र युवा सेनेचे अध्यक्ष आणि झेवियर्सचे माजी विद्यार्थी आदित्य ठाकरे याबाबत गप्प का असा सवाल उपस्थित केला जातोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.