www.zee24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील केवळ एकच उमेदवार जाहीर केला. मात्र, नांदेडचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना धक्का काँग्रेस देणार की त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले आहे.
काँग्रेसने विद्यमान प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना दे धक्का दिलाय. यवतमाळमधून आपल्या मुलाला उमेदवारी मिळवून देण्याच्या प्रयत्नात असलेल्या माणिकराव ठाकरेंना काँग्रेसनं हादरा दिला आहे. आज पक्षानं २६ उमेदवारांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातून एकमेव यवतमाळ-वाशिमच्या जागेची घोषणा करण्यात आली. याठिकाणी पक्षानं मंत्री शिवाजीराव मोघे यांनी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे ठाकरे यांना चांगलीच चपराक बसली आहे.
माजी केंद्रीय मंत्री अंबिका सोनी आणि पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना निवडणूक रिंगणात उतरविले. काँग्रेसचे सरचिटणीस मधुसूदन मिस्त्री यांनी जाहीर केलेल्या २६ उमेदवारांच्या यादीत पश्चिम बंगालचे २१, बिहार आणि पंजाबचे प्रत्येकी दोन तर महाराष्ट्राच्या एका उमेदवाराच्या नावाचा समावेश आहे.
याआधी पालघरमधून राजेंद्र गावित, चंद्रपूरमधून संजय देवताळे यांच्यापाठोपाठ लोकसभेच्या रिंगणात उतरलेले मोघे हे काँग्रेसचे तिसरे मंत्री आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.