www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
16 तारखेच्या निकालानंतर NDAची केंद्रात स्वबळावर सत्ता येईल, असा विश्वास भाजप नेत्यांना आहे. मात्र पक्षातल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार NDAला एनडीएला 290 ते 305 जागा मिळतील. मात्र एखादा पक्ष न मागता एनडीएला पाठिंबा देऊ इच्छित असेल तर आम्ही त्याचं स्वागत करु असंही भाजपनं स्पष्ट केलंय.
उत्तर प्रदेशमध्ये 50 ते 55 जागा मिळण्याची शक्यता असल्यामुळे NDAला केंद्रात स्वबळावर सरकार स्थापन करण्यात अडचण येणार नसल्याची भाजपमध्ये चर्चा आहे. बसपा उत्तर प्रदेशात दोन नंबरचा पक्ष असेल असंही भाजपचा अंदाज आहे. महाराष्ट्रात महायुतीला किमान 35 जागा मिळण्याची शक्यता पक्षातल्या सूत्रांनी वर्तवलीये. बिहारमध्ये एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षाही जास्त जागा मिळतील, असं भाजपला वाटतंय.
देशात सोमवारी शेवटच्या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलच्या निष्कर्षांनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार, असंच चित्र दिसतंय. मात्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण असा प्रश्न उपस्थित होतो. त्या रेसमध्ये भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि गुजरातच्या मंत्रिमंडळातील महसूल मंत्री आनंदीबेन पटेल यांचं नाव आघाडीवर आहे.
गुजरात भाजपच्या सर्व आमदारांची काल बैठक पार पडली. 16 मे नंतरच म्हणजेच लोकसभा निवडणूकांच्या निकालानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं. भाजपाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांना आयकर विभागानं क्लीन चिट दिल्यानंतर आता त्यांची पुन्हा एकदा भाजपच्या अध्यक्षपदी फेरनिवड होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
भाजपाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्यावेळी आयकर विभागानं गडकरी यांच्या कार्यालयावर छापे मारले होते..त्यामुळे त्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत माघार घेतं राजीनामा दिला होता...पण आता मात्र गडकरी यांच्यावर कोणतंही प्रकरण प्रलंबित नसल्याचं खुद्द आयकर विभागानं स्पष्ट केलय. त्यामुळे गडकरी पुन्हा अध्यक्षपदी येण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.