www.24taas.com, झी मीडिया, गाझियाबाद
बऱ्याचदा आपल्या वादग्रस्त वक्त्यव्यांसाठी चर्चेत राहणारे समाजवादी पक्षाचे नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी पुन्हा असंच एक बेजबाबदार आणि वादग्रस्त विधान केलंय.
`कारगिल युद्धात भारताला विजय मुस्लिम सैनिकांमुळे मिळाला... या विजयात हिंदू सैनिकांचा वाटा नव्हता` अशी मुक्ताफळं आझम खान यांनी उधळलीत. `देशाच्या सीमांची सुरक्षा मुस्लिमांपेक्षा आणखी कुणीही चांगल्या पद्दतीनं करू शकत नाही. यामुळेच सेनेत मुस्लिमांना भरती करायला हवं` असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. ते लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातील जाहीर भाषणात बोलत होते.
गाझियाबादमध्ये ही रॅली सुरू होती. समोर बसलेल्या जनतेला संबोधित करत आझम खान यांनी `१९९९ च्या कारगिल युद्धात भारताला अनेक मुस्लिम सैनिकांनी विजय मिळवून दिला. जेव्हा आपण कारगिल जिंकलं तेव्हा तिथं कोणताही हिंदू सैनिक नव्हता` असं म्हटलं.
आझम खान यांच्या विधानाचा काँग्रेस, भाजपनं निषेध केलाय.. भाजपनं आझम खान यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी, अशी मागणी केलीय. भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी ट्विट करत `आझम खान आपल्या फायद्यासाठी सेनेला धर्माच्या आधारावर विभाजण्याचा प्रयत्न केलाय` असं म्हटलंय.
यापूर्वीही, आझम खान यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना `कुत्र्याच्या पिल्लाचा मोठा भाऊ` असं म्हटलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.