www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेत `कमळ` हातात घेतले खरे, पण हेच कमळ त्यांना अडचणीचे ठरले आहे. कमळ हातात घेऊन हातवारे करत माहिती देण्याचा प्रयत्न केला. हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार काँग्रेसने केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचे आदेश दिले.
कालपर्यंत सूटवर लावलेलं कमळ आज मोदींनी हातात घेतलं. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मोदींनी `कमळ` हातात घेऊन पत्रकार परिषद घेतली. मोदीचं हेच कमळ हातात घेणं काँग्रेसला आक्षेपार्ह वाटले. काँग्रेसनं मोदींविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. मोदींची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. मात्र, निवडणूक आयोगाने तक्रारीची दखल घेत तात्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे आता काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगानेही याप्रकरणाची गंभीर दखल घेत मोदींविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मोदींची चौकशी करताना त्याबाबत सविस्तर अहवाल द्यावा, असेही केंद्रीय निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे. या मुद्द्यावर आयोगाची एक बैठक सध्या सुरू असून मोदींकडून आचारसंहितेचा भंग झाला आहे की नाही याची खात्री केली जाणार आहे.
मोदींनी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास गांधीनगरमध्ये मतदान केलं. मतदान केंद्रातून बाहेर आल्यानंतर मोदींनी `कमळ` चिन्ह हातात घेऊन लोकांना दाखवलं. यावेळी मोदींनी आपल्या मोबाइलमधून मतदान केल्याचा सेल्फी फोटोही काढला. यानंतर किमान २० मिनिटं मोदींनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार `परिषदेवेळीही मोदी `कमळ` चिन्ह हातात घेऊन सतत कॅमेऱ्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न करत होते.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.