मुंबई : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आपण कोणत्याही वेळेला काहीही खातो. पण, प्रत्येक गोष्ट खाण्याची एक वेळ असते. शरीराच्या पचनशक्तीचा त्याच्याशी संबंध असतो. त्यामुळे रोजच्या आहारातले कोणते पदार्थ कधी खावे हे लक्षात ठेवले पाहिजे.
भात
भात पचण्यासाठी सोपा असतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणात भात खावा. भात खाल्ल्याने झोपही चांगली येते. पण, तरी तो प्रमाणात खावा. दुपारच्या जेवणात भात खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्याने झोप येते.
दही
दही नेहमी दिवसा खावे. दही खाल्ल्याने पोट चांगले राहते. दह्याचे रात्री सेवन केल्याने सर्दी, कफ वाढण्याची शक्यता असते.
साखर
साखर दिवसा ग्रहण करावी. कारण, शरीरात असलेले इन्शुलिन साखरेला ग्रहण करण्याची क्षमता राखून असते. त्यामुळे खाल्लेली साखर चांगली पचते. रात्रीच्या वेळेस साखर खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते.
केळे
व्यायाम केल्यानंतर केळे खाणे उत्तम ठरू शकते. केळे ऊर्जावर्धक असते. एक केळं खाल्ल्यानंतर बराच काळ भूक लागत नाही. त्यामुळे दुपारच्या वेळेसही केळं खाणं चांगलं ठरू शकतं. अनेक लोकांना रात्री झोपण्याच्या आधी केळं खाल्ल्याने सर्दी होण्याची शक्यता असते.
डाळ
सकाळी किंवा दुपारच्या जेवणात डाळ खाल्ल्याने ती चांगली पचू शकते. त्यामुळे गॅस होत नाही. रात्री खाल्ल्याने डाळ पचण्यास त्रास होऊ शकतो.
चीज
चीज पचण्यास जड असते. त्यामुळे ते सकाळी खावे. संध्याकाळी ते खाल्ल्यास पचण्यास जड असते आणि वजन वाढण्याचा धोकाही वाढतो.
दूध
दूध प्यायल्याने झोप चांगली येते. त्यामुळे ते रात्री प्यावे. पण, दूध कधीही प्यायले तरी काही समस्या उद्भवत नाही.
कॉफी
कॉफी उर्जावर्धक असते. त्यामुळे दिवसा प्यावी. साधारणतः संध्याकाळी कॉफी पिणे टाळावे, कारण यामुळे रात्री झोप येण्यास समस्या उद्भवू शकते.
अक्रोड
रात्री झोपताना स्नॅक म्हणून अक्रोड खावे. झोप आणणारे मेलाटोनीन हार्मोन अक्रोडमुळे तयार होतात. त्यामुळे झोप चांगली येते.