www.24taas.com, मुंबई
असं म्हणतात की जो वेळेवर उपयोगी पडतो तोच खरा मित्र.. पण टीम इंडियाचा कॅप्टन कूल धोनीसाठी मात्र त्याचा जिवलग मित्र काही उपयोगी पडत नाही.. धोनीचा मित्र ना टीम इंडियासाठी उपयोगी ठरतोय ना धोनीसाठी.. इतकच काय पण धोनीचा हाच मित्र पाकिस्तान विरुद्धच्या पराभवाचं मोठं कारण ठरला.. पण तरीही धोनी आपल्या मित्राची पाठराखण करण्यातच मग्न आहे. धोनीच्या या खास मित्राचं नाव आहे रविंद्र जाडेजा...
धोनीचा बेस्ट फ्रेड रविंद्र जाडेजा...ये दोस्ती हम नही छोडेंगें असं म्हणायला लावणारी ही दोस्ती... मात्र या मैत्रीची किंमत आता टीम इंडियाला मोजावी लागते. जाडेजाच होता ज्याच्या बॉलवर पाकिस्तानी बॅट्समन शोएब मलिकनं सिक्स लगावत टीम इंडियाचा पहिल्या टी-20त पराभव केला. पाकिस्तानी कॅप्टन मोहम्मद हाफीजला तर पूर्ण विश्वास होता की, जर शेवटची ओव्हर जाडेजा टाकणार असेल तर पाकिस्तानचा विजय निश्चित. असं असलं तरी जाडेजाचा परम मित्र धोनी मात्र आपलं जाडेजा पुराण गाण्यातच मग्न होता.
जाडेजा असा आहे, जाडेजा तसा आहे... जाडेजा हे करु शकतो.. जाडेजा ते करु शकतो... क्रिकेटप्रमी धोनीचं हे जाडेजा प्रेम ऐकून आता पुरते थकले आहेत. शेवटची ओव्हर जाडेजाला देण्याचा निर्णय कितपत योग्य होता हा प्रश्न धोनीला विचारण्यात आला आणि त्याचं उत्तर देताना धोनीचं जाडेजा प्रेम ओतू जात होतं. धोनीनं जाडेजाचे जे गुण गायले ते गुण आपल्यात आहेत याचा साक्क्षातकार जाडेजालाही तेव्हाच झाला असेल...
अटीतटीच्या मॅचमध्ये पाकिस्तानला जिंकण्यासाठी ६ बॉल्समध्ये १० रन्सची गरज होती.. आणि धोनीनं आपल्या जिवलग मित्राच्या हातात बॉल दिला त्याचा परिणाम म्हणजे टीम इंडियाचा पराभव. जाडेजाच्या हातात बॉल पाहिल्यावर आपला विजय पक्का असं पाकिस्तानी कॅप्टनला तेव्हाच समजलं होतं. सुनील गावसकर यांनाही हा अंदाज होताच आणि मॅच संपल्यावर त्यांनी ही बाब मान्यही केली. मला माहित होतं की शेवटची ओव्हर जाडेजा टाकणार असेल तर त्याला कमीत कमी एक सिक्स बसेलच.. जर अश्विनला खेळवलं असतं तर बॉलिंगमध्ये नाही तर त्यानं कमीत कमी बॅटिंगमध्ये तरी कमाल केली असती. धोनीनं जाडेजावर इतका विश्वास ठेवण्याचं कारण तरी काय? जाडेजानं ४ बॉल्समध्ये फक्त २ रन्स केले.
त्यानं टाकलेल्या २.४ ओव्हर्समध्ये तब्बल २९ रन्स ठोकून काढले होते. आता प्रश्न हाच पडतो की जो क्रिकेटपटू फक्त २ रन्स करतो आणि आपल्या कोट्याच्या ४ ओव्हर्सही पूर्ण करत नाही त्याचं टीममध्ये काय काम? टी-20 जाडेजाच्या हे आकडे तर धक्कादायकच म्हणावे लागेल. जाडेजानं आतापर्यंत खेळलेल्या १४ टी-२० मॅचेसमध्ये फक्त १ सिक्स लगावला आहे. तर बॉलिंग करताना त्यानं तब्बल २० सिक्सर्स लुटलेत. या सर्व गोष्टींकडे धोनी मात्र पूर्ण दुर्लक्ष करत जाडेजा ऑल राऊंडर असल्याची दवंडी पिटतोय. चाहत्यांना मात्र आता हे पचत नाहीय एवढं मात्र नक्की.....