संविधान दिन : 'राज्यघटना चांगल्या लोकांच्या हाती दिली नाही तर माती'

२६ नोव्हेंबर हा दिवस आज देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातोय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ही घोषणा केंद्र सरकारनं केलीय.

Updated: Nov 26, 2015, 08:58 AM IST
संविधान दिन : 'राज्यघटना चांगल्या लोकांच्या हाती दिली नाही तर माती'

नवी दिल्ली : २६ नोव्हेंबर हा दिवस आज देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातोय. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त ही घोषणा केंद्र सरकारनं केलीय.

'आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करत आहोत.' भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या याच मसुद्याला २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेत मंजुरी देण्यात आली. त्यामुळेच २६ नोव्हेंबर यंदा संविधान दिन म्हणून साजरा होतोय. त्यानिमित्त संसदेचं खास अधिवेशन आयोजित करण्यात आलंय.

मुख्य उद्देशिका, १२ परिशिष्ट, २२ विभाग, ४४८ कलमांचा समावेश असलेल्या भारतीय राज्यघटनेत आतापर्यंत ९९ सुधारणा करण्यात आल्यात. जगातली सर्वात मोठं संविधान म्हणून भारतीय संविधानाची नोंद होते. लोकशाही प्रजासत्ताक ही आपल्या संविधानाची सर्वात महत्त्वाची ओळख. व्यक्तीस्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, धर्मनिरपेक्षता, कायद्याचं राज्य ही आपल्या संविधानाची शक्तिस्थळं आहेत.


डॉ. आंबेडकर

चांगली राज्यघटना चांगल्या लोकांच्या हाती दिली नाही तर तिची माती होईल, असं खुद्द डॉ. आंबेडकरांनी बजावलं होतं. विविधतेत एकता जपणा-या या देशाला बांधून ठेवण्याची ताकद भारतीय संविधानात आहे. ४२ व्या घटना दुरूस्तीच्या माध्यमातून संविधानाला धक्का लावण्याचा प्रयत्न झाला. मात्र त्यानंतरही संविधान अभेद्य राहिलं.भारतात सामाजिक आणि आर्थिक समता नांदावी, हे बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी रोजच संविधान दिन साजरा व्हायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त होतेय.

देशात सध्या असहिष्णुतेची हवा पसरलीय. संविधान बचावचा नारा देखील अधूनमधून दिला जातो. मात्र परिस्थिती म्हणावी तेवढी गंभीर नक्कीच नाही. कुठल्याही काळात हे संविधान कुचकामी ठरणार नाही, याची काळजी ते बनवतानाच घेण्यात आलीय. आणि देशातली जनता जागरूक आहे, तोपर्यंत हे संविधान अमर आहे, यात काही शंकाच नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.