नवी दिल्ली : एनआयएनं आयसिसचं अबुधाबी मॉड्यूल उघड केलंय. अबुधाबीहून दिल्लीत आलेल्या तीन आयसिस दहशतवाद्यांना अटक करण्यात आलीय. त्यात एका महाराष्ट्रीय युवकाचा समावेश आहे.
आयसिसमध्ये तरूणांची भरती करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. महाराष्ट्रातल्या फरहान शेख या तरूणाचा यात समावेश आहे. तर शेख अझर उल इस्लाम हा तरूण जम्मू काश्मीरचा आहे. अदनान हसन नावाचा तरूण कर्नाटकचा आहे.
अबुधाबी इथं कामाला नेतो असं सांगून पैशाचं आमीष दाखवून ते तरूणांना आयसिसच्या जाळ्यात खेचत होते. हे तरूण भारतात कमी आणि अबुधाबीत जास्त असायचे. भारतात एका घातपाती कारवाईसाठी काही तरूणांना भेटण्यासाठी ते आले होते अशी माहिती मिळत आहे. या तिघांना आज दिल्लीच्या विशेष न्यायालयात हजर केलं जाणार आहे.