नवी दिल्ली : केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणा-या पद्म पुरस्तारांसाठी लॉबिंग होत असल्याचा दावा अनेकदा झालाय. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच पद्म पुरस्कारांसाठी दिल्लीत लॉबिंग होत असल्याचा गौप्य स्फोट केलाय. ते नागपूरात झालेल्या एका सांस्कृतीक कार्यक्रमात बोलत होते.
पद्मभूषण पुरस्कार आपल्याला मिळावं ही मागणी करत हिंदी चित्रपटातील ज्येष्ट अभिनेत्री आशा पारेख आपल्याला भेटल्याचं गडकरींनी सांगितलंय. आपण मुंबईत असताना आपल्या घराची लिफ्ट बंद असली तरीही इमारतीचे १२ मजले चढून त्या भेटायला आल्या होत्या असे देखील गडकरी म्हणाले.
आशा पारेख यांनी आजवर अनेक चित्रपटात काम केले असून चित्रपट सृष्टीत त्यांचे नाव सन्मानाने घेतले जाते. हे पुरस्कार मिळावे याकरता अनेक शिफारसी आपल्याकडे येत असून हि मोठी डोकेदुखी असली तरीही त्या संबंधाने आपण शेकडो पत्र लिहिल्याचे देखील त्यांनी सांगितले.
मिळाल्या पेक्षा जास्त मिळावे हि अपेक्षा मानवी जीवनात असते आणि अगदी नगरसेवक असलेल्या व्यक्तीला देखील एक दिवशी मंत्री व्हायचे असते, असे देखील ते म्हणाले. सेवासदन संस्थेतर्फे दिले जाणारे रमाबाई रानडे पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.