लखनऊ : सातव्या टप्प्याच्या मतदानाआधी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाहांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत उत्तर प्रदेशात २०१४ पेक्षाही मोठी लाट भाजपच्या बाजूनं असल्याचं अमित शहांनी म्हटलंय.
गेल्या तीन दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीत ठाण मांडून जोरदार प्रचार केला. सत्ताधारी समाजवादी पक्ष आणि काँग्रेसच्या आघाडीवर सडकून टीका केली. पण मोदींच्या प्रचार झंझावातावरच टीका होऊ लागलीय. एखाद्या पंतप्रधानांनं विधानसभेच्या एकाच टप्प्यासाठी इतका प्रचार करणं शोभत नाही असा सूर विरोधकांनी लावलाय. पण लोकशाहीत निवडणूक हे आमच्यासाठी एक पर्व आहे आणि आम्ही ते साजरं करतो असं म्हणत पंतप्रधानांनी केलेल्या प्रचारचं अमित शाहांनी समर्थन केलं आहे.