गडकरीच होणार होते अध्यक्ष - राजनाथ सिंह

नितीन गडकरी यांचे काम चांगले होते, असा कौतुकाचा वर्षाव करत तेच दुसऱ्यांदा अध्यक्ष होणार होते, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 23, 2013, 03:13 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
नितीन गडकरी यांचे काम चांगले होते, असा कौतुकाचा वर्षाव करत तेच दुसऱ्यांदा अध्यक्ष होणार होते, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी केले.
दिल्लीत आज भाजपचे नूतन अध्यक्ष निवड करण्यात आली. यावेळी लालकृष्ण आडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, व्यंकय्या नायडूंसह माजी अध्यक्ष नितिन गडकरी उपस्थित होते.

आपला देश संकटांचा सामना करीत आहे. याला केवळ काँग्रेसच जबाबदार आहे. ते काँग्रेस सरकारमुळे आले आहे. देशावरील संकटाला काँग्रेसच जबाबदार आहे. कारण स्वातंत्र्यानंतर जास्त वेळ सत्ता ही काँग्रसची राहिली आहे, अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली. त्याचवेळी नितीन गडकरी यांना पक्षाच्यावतीने दुसऱ्यांदा अध्यक्षपद द्यायचे होते. मात्र, त्यांना ज्या पद्धतीने टार्गेट केले आणि त्यांच्यावर उगाचच भ्रष्टाचाराचे आरोप लावले गेले. त्यामुळे त्यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिलाय, असे स्पष्टीकरण राजनाथ यांनी देत गडकरींची पाठराखण केली.

जरी मला अध्यक्षपदी निवडले गेले तरी ते पदासाठी नाही तर एक पक्षाची जबाबदारी म्हणून मी ते पद स्वीकारले आहे, असे राजनाथ यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देशात हवेमध्ये विष ढवळण्याचे काम केले आहे. शिंदे यांच्या व्यक्तव्याबाबत समाचार घेताना पक्ष देशात त्यांच्याविरोधात आंदोलन छेडेल, असे राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले. शिंदे यांनी जयपूर येथे काँग्रेसच्या चिंतन शिबिरात भाजप आणि आरएसएस प्रशिक्षणाच्या नावाखाली हिंदू दहशतवादी घडविण्याचे काम करीत असल्याचे वादग्रस्त विधान केले होते.