नवी दिल्ली : येथील महानगरपालिका निवडणुकांच्या बुधवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये पुन्हा भाजपने आपली सत्ता काबीज केली आहे. याआधी भाजपची सत्ता होती. ही सत्ता भाजपने पुन्हा राखली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत आम आदमीने भाजपला सुपडा साप केला होता. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक महत्वाची होती. तर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. मात्र, केजरीवाल यांना मोठा धक्का बसलाय.
भाजपने पुन्हा सत्ता काबीज करताना काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा अक्षरश: धुव्वा उडाला. दिल्ली उत्तर, दिल्ली दक्षिण आणि दिल्ली पूर्व या तीन महानगरपालिकांमध्ये गेल्या दहा वर्षांपासून भाजपची सत्ता होती. त्यामुळे यंदा भाजपला अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टरचा फटका बसेल, असे गृहीत धरले जात होते. मात्र, आज निकाल जाहीर झाल्यानंतर हे सर्व चुकीचे ठरले.
सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यापासूनच भाजपने तिन्ही महानगरपालिकांमध्ये मोठी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम ठेवली. तर दुसरीकडे दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'ला मिळालेला जनाधार मोठ्याप्रमाणात कमी झाल्याचे दिसून आले. तर या निवडणुकीत पक्षाला नवसंजीवनी मिळेल ही काँग्रेसची अपेक्षाही सपशेल फोल ठरली.
या निकालानंतर आता काँग्रेस पक्षातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरूवात केली आहे. तर आम आदमी पक्षाने अपेक्षेप्रमाणे पराभवाचे खापर ईव्हीएम मशिन्सवर फोडले आहे.
एकूण २७० प्रभागांसाठी झालेल्या निवडणुकीत तब्बल १८५ जागांसह भाजप दणदणीत विजयाकडे कूच केली. उत्तर दिल्ली महापालिकेतील १०४ जागांपैकी ६६ जागांवर भाजपचा झेंडा फडकताना दिसतो, तर दक्षिण दिल्लीत (१०४ जागा) त्यांनी ७२ जागांवर बाजी मारलीय. पूर्व दिल्लीच्या ६४ जागांमध्ये तब्बल ४७ जागांवर आघाडी घेत भाजपनं विरोधकांना धूळ चारली आहे. तर उत्तर दिल्ली महानगरपालिकेत भाजप-६१, आप- १८, काँग्रेस १३, अपक्ष-२ जागांवर विजयी; उर्वरित आठपैकी तीन जागांवर भाजपची आघाडी होती.
गेल्या दहा वर्षांमधील भाजपच्या सत्ताकाळात दिल्लीतील नागरिकांना अनेक मुलभूत सुविधांचा अभाव आणि आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागले होते. या उदासीन कारभाराचा भाजपला निवडणुकीत फटका बसेल असे वाटत होते. मात्र, जनतेने भाजपला साथ दिलेय.
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मोदी यांच्यावर टीका करुन ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. मात्र, दिल्लीकरांनी भाजपच्या पारड्यात भरभरुन दान टाकल्याने हे यश पक्षाच्यादृष्टीने ऐतिहासिक मानले जात आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी या यशाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गेल्या अडीच वर्षातील कारभाराला दिले आहे.
२४ एप्रिलला या तिन्ही महानगरपालिकांसाठी सरासरी ५३.५८ टक्के मतदान झाले होते. तीन महानगरपालिकांच्या २७२ पैकी २७० प्रभागांसाठी हे मतदान झाले होते. दिल्लीकर मतदार ज्या ३ महापालिकांसाठी मतदान करतात, त्या पूर्व महापालिकेत ६४, उत्तर महापालिकेत १०४ व दक्षिण महापालिकेत १०४ असे एकूण २७२ वॉर्ड आहेत.