नवी दिल्ली : काँग्रेस अडचणीत आल्याने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांच्या मदतीला धावून आले आहेत.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी राष्ट्रवादीच्या खासदारांनी त्यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे इतर खासदार उपस्थित होते.
कोळसा घोटाळा प्रकरणी मनमोहन सिंग यांना समन्स बजावण्यात आलेत. मात्र या प्रकरणात डॉ. मनमोहन सिंग यांचा सहभाग नसल्याची भूमिका राष्ट्रवादीनं मांडलीय. त्यामुळंच त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ही भेट घेण्यात आलीय..
महाराष्ट्रात अविश्वास ठरावाच्या निमित्ताने राष्ट्रवादी आणि भाजप यांची जवळीक वाढल्याची चर्चा होत असली तरी शरद पवार यांच्या राजकारणाचा गेल्या काही वर्षांतील इतिहास बघितल्यास दिल्लीच्या तख्ताशी जुळवून घेण्यावर पवार यांचा भर राहिला आहे.
वसंतदादा पाटील यांच्या सरकारला सुरुंग लावीत शरद पवार यांनी १९७८ मध्ये तेव्हा केंद्रात सत्तेत असलेल्या जनता पक्षाशी जुळवून घेतले. जनता पक्षाच्या मदतीने पवारांनी पुलोदचा प्रयोग केला आणि पवार तेव्हा मुख्यमंत्री झाले. राजीव गांधी सत्तेत येताच पवार यांनी काँग्रेसशी पुन्हा जुळवून घेतले.
राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने भाजप सरकारला मदत होईल, अशी भूमिका घेतली होती. यामुळेच पवार आणि सत्ताधारी पक्ष हे समीकरण कायम आहे. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भाजपशी जुळवून घेण्यावर राष्ट्रवादीचा भर रहिला आहे.
अलीकडेच बारामती दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमने उधळली होती. तसेच आपण पवार यांचा नेहमीच सल्ला घेतो हे सांगण्यास मोदी विसरले नव्हते. त्यामुळे पवारांच्या नव्या भूमिकेबाबत चर्चा होत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.