श्रीनगर : हिजबुल मुजहिदीनचा म्होरक्या बुरहान वानीला भारतीय जवानांनी ठार केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे शुक्रवारीही काश्मीरचं खोरं धुमसत होतं.
शुक्रवारी नमाजासाठी जमणारी गर्दी लक्षात घेता प्रशासनानं शुक्रवारीही काश्मीरच्या १० जिल्ह्यांमध्ये कर्फ्यू कायम ठेवला. गेल्या शनिवारपासून या भागात तणावाचं वातावरण आहे.
राज्याच्या विविध भागांत झालेली दगडफेक आणि पोलिस ठाण्यांतील हल्ल्यांमध्ये दोन जणांचा मृत्यू झालाय तर २३ जण जखमी झालेत. जखमींमध्ये ९ सुरक्षारक्षकांचा समावेश आहे. वाणीच्या मृत्यूनंतर उसळलेल्या दंग्यात आत्तापर्यंत ३६ जण ठार झालेत.
खोऱ्यातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा सलग सातव्या दिवशी निलंबित करण्यात आलीय. ट्रेनही बंद आहेत.
संचारबंदीचे आदेश धुकडावून रस्त्यांवर उतरलेल्या नागरिकांच्या गर्दीतून हल्लेखोरांनी अनेक पोलीस ठाण्यांना लक्ष्य केलंय.