भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये मंडलेश्वरला जिथून पाणीपुरवठा होतो त्याच ठिकाणी एका पंपात चक्क मृतदेह अडकला होता, अशी माहिती मिळाल्याने नगरात खळबळ पसरली आहे. हा मृतदेह इथे कधीपासून फसला होता याची काहीही माहिती मिळालेली नाही.
शुक्रवारी सकाळी साधारण नऊ वाजण्याच्या सुमारास नगरातील लोकांना ही माहिती मिळाली. लोकांना हे समजताच परिसरात एकच हल्लाबोल झाला. अनेकांनी तर आपल्या घरात साठवलेले सर्वच्या सर्व पाणी बाहेर ओतून टाकले. हा मृतदेह अत्यंत खराब परिस्थितीत होता. त्यामुळे हा मृतदेह आहे हे कोणाच्या लक्षातही आले नाही. ज्या ठिकाणी पाणी शुद्ध होण्यासाठी पंपात शिरते त्याच ठिकाणच्या कचऱ्यात हा मृतदेह पडला होता.
आता मात्र हा मृतदेह कोणाचा आहे हे जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तो ताब्यात घेतला असून फॉरेन्सिक एक्सपर्ट्सकडे पाठवला आहे. तो मृतदेह साधारण किती दिवस इथे होता हे जाणण्याचाही पोलीस प्रयत्न करत आहेत. लोकांनी या सर्व प्रकारासाठी स्थानिक नगरपंचायतीला जबाबदार धरलं आहे. हे पाणी खाण्यापासून ते अगदी पूजाअर्चा करण्यासाठीही वापरलं गेल्याने लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.