नवी दिल्ली : काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर आरोप करत मोदींची 'दृढ इच्छा' भारतासाठी महागात पडत असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील एनडीए सरकारवर केली आहे. मोदी सरकारच्या कमकुवत पाकिस्तान धोरणाचे गंभीर परिणाम भारताला भोगावे लागत असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.
मोदी यांच्या कमकुवत धोरणामुळे मोदी सरकारने पाकिस्तानला भारत-पाक चर्चेचा अजेंडा ठरवू दिला आणि या वाटाघाटीत भारताला असलेली संधी सरकारने गमावली आहे, असं काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला शुक्रवारी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली.
पाकिस्तानने भारतासोबतची शांतीप्रक्रिया एकतर्फी रद्द करावी, हा पाकिस्तानने भारताला धोका दिल्याचा पुरावा असल्याचं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. गेल्या सरकारने पाकिस्तानला जगासमोर उघडं पाडलं होतं; मात्र या सरकारने हे सर्व प्रयत्न वाया घालवल्याचं म्हटलं आहे.
भारताला शेजारील सर्व राष्ट्रांशी चर्चा करुन वादांवर तोडगा काढण्याची इच्छा आहे. मात्र, समस्या अशी आहे की मोदी सरकारने आपल्या कमजोर धोरणांमुळे पाकिस्तानलाच या चर्चेचा अजेंडा ठरवू दिला. हे सरकारचं अपयश असल्याची टीका त्यांनी केली आहे. मोदींना जागतिक स्तरावर मोठा नेता होण्याची इच्छा आहे. या त्यांच्या इच्छेमुळे भारतापेक्षा पाकिस्तानला जास्त फायदा होत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.