www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
देशाला हादरवणार्या दिल्लीतील क्रूर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही दोषींची फाशीची शिक्षा दिल्ली हायकोर्टानं कायम ठेवली आहे. ‘निर्भया’वरील बलात्काराचा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ असल्याचं नमूद करत हायकोर्टानं फास्ट ट्रॅक कोर्टाच्या निर्णयावरच शिक्कामोर्तब केलंय.
१६ डिसेंबर २०१२च्या रात्री दक्षिण दिल्लीतील वसंत विहार भागात सहा नराधमांनी ‘निर्भया’वर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. या सहा जणांपैकी एकानं जेलमध्येच आत्महत्या केली होती, तर एक आरोपी अल्पवयीन होता. त्याला ज्युवेनाइल कोर्टानं तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे या दोघांव्यतिरिक्त, विनय शर्मा (२०), पवन गुप्ता (१९), अक्षय ठाकूर (२८) आणि मुकेश सिंह (२६) या चार दोषींना फास्ट ट्रॅक कोर्टानं १३ सप्टेंबरला फाशीची शिक्षा सुनावली होती. या चौघांचा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ असून या घटनेनं सामाजिक सभ्यतेची आणि विवेकाची चौकटच हलवून टाकल्याचे न्यायमूर्तींनी नमूद केलं होतं.
या फाशीच्या शिक्षेविरोधात चारही जणांनी हायकोर्टात दाद मागितली होती. परंतु, तिथंही त्यांची ही शिक्षाच कायम राहिली आहे. न्या. रेवा खेत्रपाल आणि न्या. प्रतिभा राणी यांच्या खंडपीठाने त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केलं. दरम्यान, दिल्लीतील सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणी, ‘निर्भया’चा सिंगापूरच्या हॉस्पिटलमध्ये २९ डिसेंबर २०१२ ला मृत्यू झाला होता.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.