लखनऊ : देशाच्या चलनातून ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर रिर्झव्ह बॅंकेने चलनात ५०० आणि २००० रुपयांची नव्या नोटा चलनात आणल्या. या नव्या नोटांची कोणीही नक्कल करु शकणार नाही, असे सांगण्यात आले. मात्र, देशात काही ठिकाणी २००० रुपयांच्या नकली नोटा सापडत आहेत. तर उत्तर प्रदेशात चक्क नोटा छपाईंचा कारखानाच असल्याचे समोर आले. या कारखान्यातून ७० लाखांचे चलन बाजारात आले आहे.
उत्तर प्रदेशमधील कानपूर देहातमध्ये पोलिसांनी २००० रुपयांच्या बनावट नोटा छपाई करणाऱ्या फॅक्टरीचे भांडाफोड केले. याप्रकरणी ३ लोकांना अटक करण्यात आली आहे. हे तीन लोक नोटा छपाईबरोबर बाजारात नकली नोटा आणत होते. पोलिसांनी आरोपींकडून ७ लाख ६४ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्यात. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
मंगळवारी पोलिसांनी छापा मारत येथील प्रिंटिंग प्रेसचे साहित्य जप्त केले आहे. या ठिकाणी आणखी एक मशिन सापडले आहे. दरम्यान, बनावट नोटा तयार करण्याचे कानपूरमध्ये रॅकेट असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आतापर्यंत कानपूर येथील छपाई कारखान्यातून ७० लाखांच्या २००० रुपयांच्या नोटा छापल्याचे पुढे आले आहे.