नागपूर : देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी मंत्री महादेव जानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर महादेव जानकरांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे.
जानकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असल्यानं त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश द्यावेत, असं पत्र गडचिरोली पोलिसांनी विधानसभा अध्यक्षांना दिलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज नगरपालिका निवडणुकीत जानकर हे निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव आणत होते.
जानकर आणि निवडणूक अधिकाऱ्याचे मोबाईल संभाषण कॅमेऱ्यात कैद झाले होते. नगराध्यक्षपदासाठी तुमच्याकडे दोन अर्ज येतील. त्यातील एक अर्ज काँग्रेसचा असेल. तर दुसरा अपक्ष म्हणून असेल. त्यातील काँग्रेसचा अर्ज बाद करा. मोटवानी तुमच्याकडे अर्ज घेऊन येतील. त्यांना कपबशीचे चिन्ह द्या, अशा शब्दांमध्ये जानकर या व्हिडीओ क्लिपमध्ये बोलताना दिसत होते. याशिवाय मी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर बोलतो आहे, असेदेखील जानकर या व्हिडीओमध्ये समोरच्याला सांगताना दिसत होते.