www.24taas.com, झी मीडिया, उन्नाव
उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यातलं डौडिया खेडा किल्ला हा १५५वर्षांपासून इतिहासाच्या पानांमध्ये लपला होता. मात्र बाबा शोभन सरकार यांच्या स्वप्नानंतर भारतीय पुरातत्व विभागानं तिथं खोदकाम सुरू केलं आणि हा किल्ला जगाच्या नकाशावर पुन्हा आला. आज संपूर्ण जगाचं लक्ष या किल्ल्याकडे आणि तिथं सुरू असलेल्या सोन्याच्या खोदकामाकडे लागलंय.
सोनं मिळेल की नाही, हे काही सांगता येत नाही. मात्र या किल्ल्याविषयी खूप रोमांचकारक माहिती मिळातेय. डौडिया किल्ला हा राजा राव रामबख्श यांचा नसून चंद्रगुप्त मौर्य यांच्याकाळापासूनच अस्तित्वात आहे.
उन्नाव जिल्ह्यातल्या डौडिया खेडा इथं गंगा नदीच्या तिरावर असलेल्या या किल्ल्याबाबत गावातील वृद्ध लोक सांगतात, की द्रोणी क्षेत्र द्रोणिखेर नावानं डौडिया खेडा हे गाव पहिले प्रसिद्ध होतं.चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळी पांचाल राज्याचा हा भाग होता. त्याकाळी ४०० ते ५०० गावांना मिळून द्रोणिखेर म्हटलं जायचं. या द्रोणिमुख क्षेत्राची राजधानी डौडिया खेडा होती, म्हणून या गावाचं खूप महत्त्व होतं. सोबतच राजाच्या सैन्याची एक तुकडी इथं कायम वास्तव्याला असायची. प्रसिद्ध पुरातत्व अभ्यासक अलेक्झांडरच्या पुस्तकातील बौद्धकालीन हयमुख नावाचं प्रसिद्ध नगर म्हणजे हेच... जिथं हर्षवर्धन काळात चीनी प्रवासी हवेनसांग आला होता.
डौडिया खेडा किल्ल्याबाबत राजा राव रामबख्श सिंह यांचे वंशज असल्याचं सांगणारे चंडीवीर प्रताप सिंह म्हणतात, इथं सुरूवातीला बाहुबली भरो यांचा कब्जा होता. भरोंकडून किल्ला जिंकण्यासाठी बैसांनी खूप वेळा प्रयत्न केले मात्र ते अयशस्वी ठरले. १२६६ सालाच्या जवळपास बैसांचे राजा करण रायचा मुलगा सेढूरायनं अखेर या किल्ल्यावर विजय मिळवला. मग या किल्ल्यावर बैसांचा अधिकार असल्यानं त्याला बैसवारा नावानंही ओळखलं जायचं. डौडिया खेडी या विभागाची राजधानी होती. बैस राजवंशामध्ये त्रिलोकचंद्र नावाचा एक महाप्रतापी राजा झाला. त्यांनी या किल्ल्याला भव्य आणि मजबुत केलं. किल्ल्यात दोन महाल बनवले, सोबतच ५०० सैनिक आत आणि किल्याबाहेर १० हजार सैन्य तैनात केलं.
राजा त्रिलोकचंद्र दिल्लीचा बादशहा बहलोल लोदींच्या खूप जवळचा होता. त्रिलोकचंद्र यांच्या काळी कालपी, मैनपुरीपासून प्रतापगढ जिल्ह्यातील माणिकपूर आणि पूर्वेकडील बहराईचपर्यंत पोहोचला होता. डौडिया खेडातील ९० वर्षीय वृद्ध सरवन सांगतात, की बैस वंशाचे शेवटचे राजा राव रामबख्श सिंह यांना २८ डिसेंबर १८५७ला फाशी दिल्यानंतर ब्रिटीश सेनाध्यक्ष सर होप ग्रांटयांनी हल्ला करुन किल्ला पाडला.
भूगोलाच्या दृष्टीनं बघितल्यास उत्तरप्रदेशातील उन्नावपासून ३३ किलोमीटर दक्षिण-पूर्व भागात ५० फूट उंचावर बनलेला हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पश्चिमेला गंगा नदी वाहते. किल्ल्याचं मुख्यद्वार पूर्वेकडे आहे. किल्ल्याची लांबी ३८५ फूट आहे. तर क्षेत्रफळ १,९२,५०० चौ. फूट आहे. किल्ल्या चारही दिशांनी ३०-३२ फूट मातीच्या भिंतीनी वेढलेला आहे. त्याच्या बाजूला ५० फूल खोल दरी होती, ज्यात नेहमी पाणी भरलेलं असायचं.
आतापर्यंत या किल्ल्याकडे ना पुरातत्व विभागाचं लक्ष गेलं ना कोणत्याही एनजीओचं... मात्र आता शोभन सरकारच्या ‘सोनेरी स्वप्ना’नंतर याकडे सगळ्याचं लक्ष गेलंय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.