मुंबई : देशात असलेल्या बनावट पॅन कार्डच्या काळ्या बाजाराला वेसण घालण्यासाठी आयकर विभागाची सुरू असलेली मेहनत अखेर फळाला आलीये. आयकर विभागाने तयार केलेल्या नव्या प्रणालीमुळे बनावट पॅन कार्ड शोधून काढणे शक्य होणार आहे.
यामुळे आयकर विभागाद्वारे दिले जाणारे पॅन कार्ड आणि पॅन कार्ड जारी करणाऱ्या इंटरमिडिएरीजने दिलेले बनावट पॅन क्रमांक यांची ओळख करणे शक्य होणार आहे. यापूर्वी एका माहितीपुस्तकाद्वारे याची ओळख केली जात असे. पण, त्यात अनेक त्रुटी होत्या. पण, आता तयार केलेल्या नव्या इलेक्ट्रॉनिक सिस्टिममध्ये मात्र या त्रुटी असणार नाहीत.
पण, यामुळे जुन्या पॅन कार्डांविषयी काही करता येणार नाही. त्यासाठी माहितीपुस्तकाचाच वापर करावा लागेल. पण, नव्या पॅन कार्डासाठी मात्र ही प्रणाली वापरली जाणार आहे. कोणी व्यक्ती दोन पॅन कार्ड जवळ बाळगून कर चुकवण्यापासून वाचू नये म्हणून गेली अनेक वर्ष आयकर विभाग या प्रणालीच्या प्रयत्नात होता.
दोन पॅन कार्ड तयार करुन त्याचा वापर काळा पैसा दडवण्यासाठीसुद्धा केला जात असे. तसेच जर कोणाकडे असलेले पॅन कार्ड बनावट असेल तर ते समजणे नव्या प्रणालीमुळे शक्य होणार आहे. तेव्हा हे दुसरे पॅन कार्ड परत करुन अधिकृत पॅन कार्ड मिळवले जाऊ शकतो.