नवी दिल्ली : प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसनं 'ऑटोमेशन'च्या कारणास्तव गेल्या एका वर्षात जवळपास 9000 कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याचं समोर येतंय.
ऑटोमेशन झाल्यानं नोकऱ्यांची संख्या घटल्यानं कामात मानवी हस्तक्षेपही कमी झाला. त्यामुळेच कंपनीत काम करणाऱ्या लोकांना कार्यमुक्त करण्यात येत असल्याचं समोर येतंय.
कंपनीचे ह्युमन रिसोर्स मॅनेजर कृष्णमूर्ती शंकर यांच्या म्हणण्यानुसार, कार्यमुक्त करण्यात आलेले कर्मचारी आणखीन जास्त अॅडव्हान्स प्रोजेक्टसवर काम करणार आहेत.
आम्ही दर तीन महिन्यांनी जवळपास 2000 लोकांना कार्यमुक्त करतो... आणि त्यांना नवीन कामासाठी स्पेशल कोर्स आणि ट्रेनिंग पुरवतो. ऑटोमेशननं निश्चितच कंपनीची ताकद वाढलीय परंतु यामुळे लोकांची आवश्यकता कमी झालीय, असं कृष्णमूर्ती यांनी म्हटलंय. 2015 साली 'फिलिप्स' सोडून कृष्णमूर्ती इन्फोसिसमध्ये सहभागी झालेत.
उल्लेखनीय म्हणजे, इन्फोसिस आणि आयबीएमला 'रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड'कडून (आरबीएस) पाच वर्षांसाठी 30 करोड युरोचं प्रोजेक्ट मिळालं होतं.... या प्रोजेक्टमधून इन्फोसिसला 20 करोड युरो मिळणार होते. परंतु, 'ब्रेक्झिट'मुळे आरबीएसनं बँक प्रोजेक्ट रद्द केलं.