www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतरही गेले तीन महिने सरकारी निवासस्थानात राहणारे आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल हे अखेर आपला मुक्काम हलवणार आहेत. सरकारी घर सोडण्यासाठी विविध स्तरांतून दबाव आल्यानंतर केजरींनी हा निर्णय घेतला आहे.
केजरीवालांचे विश्वासू सहकारी मनीष सिसोदिया यांनी ही माहिती दिली आहे. `केजरीवाल सोमवारी किंवा मंगळवारी सरकारी घर रिकामं करणार आहेत. नव्या वास्तव्यासाठी त्यांनी जंगपुरा, मयुर विहार व फेज-२ इथं तीन भाड्याची घरं पाहिली आहेत. केजरीवालांचा पुढचा मुक्काम नेमका कुठे असेल, याबाबत रविवारपर्यंत निर्णय होईल, असं सिसोदिया यांनी सांगितलं.
मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर केजरीवाल यांनी सरकारी घर सोडावं, अशी मागणी होत होती. मात्र, मुलांच्या परीक्षांचं कारण देत त्यांनी आपला मुक्काम सरकारी घरातच कायम ठेवला होता. त्यामुळं आम आदमी सेना आणि अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात निदर्शनंही केली होती. हा वाद आणखी वाढू नये म्हणून केजरीवालांनी आपला पत्ता बदलण्याचं ठरवलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.