www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
काही महिन्यांपूर्वी मुजफ्फरनगरमध्ये भडकलेल्या जातीय हिंसाचार प्रकणात एक धक्कादायक माहिती पुढे आलीय. दहशतवादी संघटना ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेनं मुजफ्फरनगरच्या हिंसाचारातील पीडितांना संपर्क करून बदला घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी पीडितांना आपल्यासोबत दहशतवादी संघटनेत सहभागी होण्यासाठीही दबाव टाकत होते.
सध्या अटकेत असलेल्या दहशतवादी अब्दुल जमीर यानं पोलीस तपासात आपलं तोंड उघडलंय. ‘लष्कर-ए-तोयबा मुजफ्फरनगर हिंसाचार प्रकरणाचा बदला घेण्याची तयारी करत होते’ असं जमीर यानं मॅजिस्ट्रेटसमोर सांगितलंय.
‘पीडित राहत असलेल्या भागात जाऊन दहशतवाद्यांनी त्यांना फूस लावण्याचा प्रयत्न केला होता. दोन्ही ईमाम जेव्हा मुजफ्फरनगर आणि शामली जात होते तेव्हा त्यांच्यासोबत लष्करचा एक व्यक्ती असायचा’ अशी माहिती पीडितांनी दिलीय.
हफीज रशीदी आणि शाहिद या दोघांनी पीडितांना कट्टरपंथी बनवण्याचा प्रयत्न केला होता, असं चौकशी अधिकाऱ्यांसमोर पीडितांनी म्हटलंय. दहशतवादी बनण्याच्या मोबदल्यात चांगलं जीवन आणि कुटुंबीयांना खूप पैसे देण्याची लालचही त्यांना दाखवण्यात आली. परंतु, पीडित लष्कराच्या जाळ्यात सापडले नाहीत त्यांनी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला याबाबत माहिती दिली.
या दोन इमामांना पोलिसांनी गेल्या महिन्यात मेवातच्या छोटी मेवली भागातून अटक केली होती. परंतु, या दोन इमामांसोबत शिबिरात जाणारा व्यक्ती मात्र अजूनही मोकाटच फिरतोय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.