www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
विद्यमान लष्करप्रमुख जनरल बिक्रम सिंग ३१ जुलै रोजी निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल दलबीरसिंग सुहाग यांची नवे लष्करप्रमुख म्हणून निवड करण्यात आली.
निवडणूक आयोगानं नव्या लष्करप्रमुखांच्या निवडीबाबत हिरवा कंदील दाखविल्यानंतर संरक्षण खात्यानं सुहाग यांच्या नावाची शिफारस पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखालील कॅबिनेटच्या नियुक्ती समितीकडे केली होती.
लेफ्टनंट जनरल दलबीर सिंह सुहाग हे सध्या आर्मी स्टाफचे व्हाईस चीफ आहेत. तसंच लष्कर प्रमुख जनरल विक्रम सिंह यांच्यानंतरचे सर्वात वरिष्ठ अधिकारी आहेत. दरम्यान, भाजपनं निवडणूक आयोगाकडे तक्रार करून नव्या लष्कर प्रमुखांची निवड रोखून धरण्याची मागणी केली होती. सध्याचे लष्कर प्रमुख जनरल विक्रम सिंह यांची मुदत 31 जुलैपर्यंत असल्यामुळं नव्या लष्करप्रमुखांचा निर्णय नव्या सरकारला घेऊ द्यावा, अशी मागणीही भाजपकडून करण्यात आली होती. मात्र सध्याचे लष्करप्रमुख निवृत्त होण्यापूर्वी तीन महिने त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांची निवड करण्याची परंपरा आहे, त्यामुळं यूपीए सरकारला लष्कर प्रमुखांची नियुक्ती करू द्यावी असा युक्तीवाद सरकारकडून करण्यात आला होता.
त्यापूर्वी सरकारनं नव्या लष्कर प्रमुखांच्या नियुक्तीसाठी इंटेलिजन्स आणि दक्षता आयोगाचीही संमती मिळवली होती. त्यानंतर निवडणूक आयोगानं परवानगी दिल्यानंतर सरकारनं तातडीनं हालचाली करत आज नव्या लष्कर प्रमुखांची नियुक्ती केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.