नवी दिल्ली : पाच वर्षांची मुलगी आणि पत्नीसह गीतकार संतोष आनंद यांचा मुलगा संकल्प यानं ट्रेनखाली स्वत:ला झोकून दिलंय. बुधवारी, मथुरेच्या कोसीकला भागात ही घटना घडलीय. या घटनेत संकल्प आणि त्याची पत्नी नंदिनी हिचा जागीच मृत्यू झालाय. तर त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा जीव मात्र थोडक्यासाठी वाचलाय परंतू ती गंभीररित्या जखमी झालीय.
दिल्लीहून आग्र्याला जाणाऱ्या इंटरसिटी एक्सप्रेससमोर उडी घेऊन संतोष आणि त्याच्या पत्नीनं आत्महत्या केलीय. पत्नीसोबत एका कारमध्ये तो घटनास्थळी दाखल झाला होता. त्यांच्या पाच वर्षांच्या गंभीररित्या जखमी मुलीला पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं हॉस्पीटलमध्ये पोहचवण्यात आलंय. कारमध्ये सापडलेल्या मतदान कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्सवरून या दोघांची ओळख पटवण्यात आलीय.
३८ वर्षांचा संकल्प दिल्लीमध्ये एका सरकारी संस्थेत लेक्चरर म्हणून काम करत होता. पोलिसांना घटनास्थळी मिळालेल्या गाडीत दहा पानांची सुसाईड नोटही सापडलीय. यामध्ये, आर्थिक कुचंबनेमुळे आपण ही आत्महत्या करत असल्याचं या दोघांनी सुसाईड नोटमध्ये म्हटलंय.
कोण आहे संकल्प आनंद?
प्रसिद्ध गीतकार संतोष आनंद यांचा संकल्प हा एकुलता एक मुलगा होता. दिल्लीच्या रोहिणीस्थित ‘लोकनायक जयप्रकाश नारायण नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ क्रिमिनोलॉजी’मध्ये संकल्प समाजशास्त्र विषय शिकवत होता. ही संस्था गृहमंत्रालयाच्या अखत्यारित काम करते. संकल्प आपल्या कुटुंबासह मयूरविहारमध्ये राहत होता.
संकल्पचे वडिल संतोष आनंद यांनी आनंद, रोटी कपडा और मकान, क्रांती, प्रेमरोग, शोर यांसारख्या सिनेमांसाठी अनेक प्रसिद्ध गाणी लिहिली आहेत.
दहा पानांचं ‘सुसाईड नोट’…
संकल्प आणि त्याच्या पत्नीनं लिहिलेलं हे सुसाईड नोट इंग्रजीमध्ये लिहिलंय... आणि दोघांनीही प्रत्येक पानावर सही केलीय. यामध्ये त्यांनी अनेक मोबाईल क्रमांकांचा उल्लेख केलाय.
यानुसार, संकल्प ज्या संस्थेत काम करत होता त्यामध्ये मोठा घोटाळा सुरु आहे. आपण एखाद्या मोठ्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळक्यात सापडल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलंय. या टोळक्याकडून संकल्पला ब्लॅकमेल करण्यात येत होतं.
या संस्थेच्या संचालकानं आपल्याला कमाईचं आमिष दाखवून आपलं आर्थिक शोषण केल्याचं यात संकल्पनं म्हटलंय. संचालकानं संकल्पला या संस्थेमध्ये निर्मिती आणि शिक्षणासाठी दीडशे करोड रुपयांच्या एका योजनेचं प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली होती... आणि याच्या बदल्यात त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरू होता... या चक्रव्युहात आपण पुरते अडकलोय... आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही, असं सुसाईड नोटमध्ये लिहून संकल्पनं पत्नी आणि मुलीसह स्वत:ला रेल्वेखाली झोकून दिलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.