मुंबई : लग्न हे आयुष्यात एकदाच होतं त्यामुळे ते भव्यदिव्य असावं अशी अनेकांची इच्छा असते. फिल्मी स्टाईलनं लग्न करताना खर्चही तितकाच मोठ्या प्रमाणात होतो.
स्टाईलिश पद्धतीने लग्न करण्याच्या इच्छेपायी लग्नकर्जाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळू लागलीये. टाटा कॅपिटलने याबाबत सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणातून लग्नासाठी कर्ज काढण्याकडे लोकांचा कल वाढू लागल्याचे समोर आलेय.
या सर्वेक्षणादरम्यान अडीच हजार लोकांना याबाबत प्रश्न विचारण्यात आले. यात विवाहित, सिंगल तसेच ज्यांची लग्न लवकरच होणार आहेत यांचा समावेश होता.
यापैकी एक तृतीयांश लोकांनी लग्न साधेपणाने करण्यास पसंती दर्शवली. तर लग्नासाठी साधारण खर्च १० लाखापर्यंत येतो असे ७४ टक्के लोकांनी सांगितले.
लग्नात सर्वाधिक खर्च हा दागिने, लग्नाचे पोषाख आणि मेकअपसाठी होतो. ६६ टक्के लोकांनी याला महत्त्व दिलेय. तर अनेकांना लग्नासाठीही कर्ज मिळते याची कल्पनाच नसल्याचे सर्वेक्षणातून समोर आलेय.