पणजी : गोव्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना मनोहर पर्रिकर चुकले. चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना त्यांनी सुरूवातीला मंत्री म्हणून शपथ घेतली. पण नंतर गडकरींनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी पुन्हा शपथ घेतली.
शपथविधीच्या वेळी अनेकवेळा गमती जमती झाल्या आहेत. आताही अशीच गंम्मत गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्याबाबत घडली. आज सायंकाळी सव्वा पाच वाजता मनोहर पर्रिकर शपथ घ्यायला उभे राहिले. पण त्यांनी सुरूवातीला मंत्रीपदाची शपथ घेतली.
यावेळी केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. त्यांनी तात्काळ व्यासपीठाजवळ जावून पर्रिकरांना आपली चूक लक्षात आणून दिली. मग पर्रिकर यांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
गोव्याचे १३ वे मुख्यमंत्री
गोव्याचे १३ वे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रिकर यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. तसेच ते चौथ्यांदा या पदावर विराजमान होत आहेत. गोव्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाल्याने पर्रिकरांना संरक्षणमंत्रीपद सोडून पुन्हा गोव्यात मुख्यमंत्री म्हणून यावे लागले आहे. तर उपमुख्यमंत्रिपदी मगोपचे सुदिन ढवळीकर यांची वर्णी लागलीय.