ब्रजेश मिश्रा, पाटणा : व्हीव्हीआयपी संस्कृती आपल्या नेत्यांच्या नसानसांमध्ये भिनलीय. याला सहृदतेचा आणि संवेदनशीलतेचा मुखवटा पांघरणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही अपवाद नाहीत. एका संतापजनक घटनेनं हे स्पष्ट केलंय.
सुकमामध्ये शहीद झालेल्या CRPFच्या 25 जवानांपैकी 5 जवान बिहारचे होते. मंगळवारी रात्री शहिदांचे मृतदेह अंतिम संस्कारासाठी पाटण्याला आणण्यात आले. पाटणा विमानतळावर श्रद्धांजलीचा कार्यक्रमही ठेवला गेला... देशासाठी हसतहसत छातीवर गोळ्या झेलणाऱ्या वीर जवानांना अखेरचा सलाम द्यायला अख्खं बिहार जमा झालं होतं... पण, इथल्या राज्य सरकारचे प्रमुखच शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी फिरकलेदेखील नाहीत.
राजकीय इतमामात या वीरांना श्रद्धांजली वाहण्यात आली... अनेक अधिकारी तिथं हजर होते... केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव, जेडीयूचे नेता शाम रजक यांच्यासह अनेक लोक होते. पण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार किंवा त्यांचा एकही मंत्री या श्रद्धांजली कार्यक्रमाकडे फिरकलाच नाही...
जेव्हा शहिदाचं पार्थिव त्याच्या घरी नेलं जातं, त्यावेळी राज्याच्या सीमेत प्रवेश केल्यापासून ते अंत्यसंस्कार होईपर्यंत सरकारचा किमान एक प्रतिनिधी सोबत असला पाहिजे, असा सर्वमान्य शिष्टाचार आहे. सरकारचे प्रतिनिधी होतेदेखील... मात्र सत्तेच्या राजकारणात मश्गुल असलेलं कोणीच शहिदांना आदरांजली वाहायला आलं नाही.
विमानतळावर श्रद्धांजली कार्यक्रमाला हजर असलेले केंद्रीय मंत्री रामकृपाल यादव यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. इतकंच नव्हे, तर मुख्यमंत्री नितीश कुमार विमानतळाजवळच एका कार्यक्रमात हजर असतानाही तिथं का आले नाहीत? असा सवाल त्यांनी केलाय.
या आरोपांवर उत्तर देण्यासाठी नितीश कुमारांचे नवे मित्र लालूप्रसाद यादव पुढे सरसावलेत. नितीश कुमारांना माहिती नसेल, असं त्यांचं म्हणणं. मात्र, हा मुद्दा राजकीय आरोप-प्रत्यारोपांपुरता मर्यादित निश्चितच नाही. देशात इतकी मोठी घटना घडते. 25 जवान शहीद होतात. एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला याची माहितीच नसते, असं होईलच कसं?
नितीश कुमारांना सुकमामधल्या घटनेबद्दल समजलं तेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांना शहीदांमध्ये बिहारचे कुणी जवान आहेत का, हे विचारलं नाही का? विचारलं असेल, तर अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना माहिती नक्कीच दिली असेल... या पाच जवानांचे पार्थिव देह बिहारमध्ये कधी आणले जाणार आहेत, हे कुमारांनी विचारलं असणार... श्रद्धांजली कार्यक्रम कधी आणि कुठे आहे याची चौकशी केली असेल... दळणवळणाची इतकी अत्याधुनिक साधनं असताना नितीश कुमारांना क्षणाक्षणाची माहिती असायला हवी होती. असं असूनही ते शहिदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आले नाहीत... आणि जर त्यांना हे माहित नसेल, तर बिहारच्या एकूण व्यवस्थेतच गोंधळ आहे असं म्हणावं लागेल.
पण विषय इथेच संपत नाही... दुसरं चित्र... मुख्यमंत्र्यांच्या गाड्यांचा हा ताफा ज्या चौकातून सुसाट गेला त्याच्या कोपऱ्यात उभा असलेला ट्रक अनेकांनी पाहिला... या ट्रकमध्ये शहिदांचे पार्थिव देह होते. त्याला बाजुला उभं राहावं लागलं, कारण मुख्यमंत्र्यांचा ताफा जायचा होता...
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातल्या सगळ्या गाड्या जाईपर्यंत शहिदांचे मृतदेह घेऊन ट्रक एका जागी उभा होता.. हा ट्रक न थांबवता मुख्यमंत्र्यांचा ताफा जाऊ शकला नसता का? ठीक आहे... क्षणभर मान्य करूयात की मुख्यमंत्र्यांना त्यांच्यासाठी वाहतूक कुठे-कशी अडवली जाते हे माहित नसतं... पण नितीश कुमारांच्या अधिकाऱ्यांनाही गाडीमध्ये शहिदांचे पार्थिव देह आहेत, हे माहित असणारच... त्यांनी तरी नितीश कुमारांना ते सांगायला हवं होतं ना...
आपल्या नेत्यांना सत्तेची इतकी नशा चढलीये का की त्यांना शहिदांच्या उचित सन्मानाचा विसर पडावा... त्यांच्या नसानसात भिनलेली व्हीव्हीआयपी संस्कृती नुसते लाल दिवे काढून जाणार नाही, हेच खरं...