नवी दिल्ली : मुंबईत असलेलं पश्चिम रेल्वेचं मुख्यालय अहमदाबादला हलवण्याची मागणी भाजपचे खासदार डॉ. किरीट सोळंकी यांनी लोकसभेत केली. खासदार सोळंकी यांच्या या मागणीमुळे मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सोळंकी हे अहमदाबाद पश्चिमचे खासदार आहेत. अहमदाबाद हे पश्चिम रेल्वेसाठी मध्यभागी पडतं. गुजरात सरकारनं रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारला पत्र लिहून याबाबत मागणी केल्याचं सोळंकींनी सांगितलं.
अहमदाबाद हे पश्चिम रेल्वेसाठी मध्यभागी पडते त्यामुळे ते सोयीस्कर होईल. तसेच गुजरात सरकारने याआधी अनेकवेळा रेल्वे मंत्रालय आणि केंद्र सरकारला या मागणीसाठी वारंवार पत्र पाठवले आहे. पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयासाठी गुजरात सरकारने जागाही उपलब्ध करून दिली आहे, अशी माहिती खासदार सोळंकी यांनी दिली.
दरम्यान, याआधी सागरी पोलीस प्रशिक्षण केंद्र गुजरातमध्ये हलवल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे खासदार किरीट सोळंकी यांच्या मागणीवर केंद्र सरकार काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.