नवी दिल्ली : 10 डिसेंबरपासून पाचशे रुपयाच्या जुन्या नोटा रेल्वे, बस आणि मेट्रोमध्ये चालणार नाहीत. यापूर्वी 15 डिसेंबरपर्यंत तिकिटांसाठी जुन्या नोटा चालतील, असं सरकारनं स्पष्ट केलं होतं. मात्र आता या निर्णयात बदल करण्यात आलाय. त्यामुळे केवळ उद्याचाच दिवस 500च्या जुन्या नोटांचा वापर आता तिकिटांसाठी करता येणार आहे. त्यामुळे आता तुमच्याकडे पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा असतील तर त्या बँकेमध्येच भराव्या लागणार आहेत.
पाचशे आणि एक हजार रुपयाच्या जुन्या नोटा बदलण्याचा निर्णय घेऊन आज एक महिना झाला आहे. नोटाबंदीच्या महिनापूर्तीच्या निमित्तानं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचे आभार मानले आहेत. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाविरोधात सुरु केलेल्या यज्ञात भारतीयांनी लावलेल्या हातभाराबद्दल सर्वांना सलाम करतो असं पंतप्रधानांनी म्हटलंय. सरकारच्या निर्णयामुळे सध्या जरी त्रास होत असला, तरी भविष्यात याचे अनेक फायदे होणार असल्याचं मोदींनी ट्विटरवर म्हटलंय.