www.24taas.com, नवी दिल्ली
महागाईच्या जमान्यात नागरिकांना पुन्हा एकदा पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीला सामोरं जावं लागणार आहे. पेट्रोल दीड रुपयानं तर डिझेल ४५ पैशांनी महागलंय. शुक्रवारी मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू झालीय.
सरकारनं इंधन कंपन्यांना दरवाढीची मुभा दिल्यावर इंधनाच्या किंमती जवळपास प्रत्येक महिन्याला वाढत आहेत. त्यामुळे महागाईच्या जमान्यात ग्राहकांच्या खिशावर प्रचंड ताण पडणार आहे. स्थानिक कर, व्हॅट गृहित धरून मुंबईत पेट्रोलमध्ये १.९१ रुपयांनी वाढ होऊन किंमती ७५.९१ रुपयांवर पोहोचलीय तर डिझेलच्या दरात ५७ पैशांची वाढ होऊन किंमती ५४.२८वर पोहोचली आहे.
पेट्रोलपाठोपाठ दरमहा डिझेलच्या किंमतीतही वाढ करण्याची परवानगी केंद्र सरकारने तेल कंपन्यांना दिली आहे. दरमहा आढावा घेण्याच्या धोरणाचा भाग म्हणून शुक्रवारी इंडियन ऑइल कंपनीने ही दरवाढ जाहीर केली. गेल्या साडेतीन महिन्यांतील पेट्रोलची ही पहिलीच दरवाढ असून डिझेलची मात्र महिनाभरात दुसरी दरवाढ आहे.