www.24taas.com, मुंबई
आरक्षित तिकिटांचा होणारा काळाबाजार रोखण्यासाठी रेल्वेनं लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रवासामध्ये ओळखपत्र सादर करणं सक्तीचं केलं आहे. एसी कम्पार्टमेंटसोबतच आता स्लीपर आणि आरक्षित सेकंड क्लासमध्येही ही सक्ती लागू करण्यात आलीय.
आजपासून प्रवाशांना ओळखपत्र आपल्यासोबतच ठेऊन प्रवास करावा लागणार आहे. शुक्रवारी मध्यरात्रीपासून रेल्वेनं ओळखपत्रं बाळगणं प्रवाशांवर बंधनकारक केलंय. तिकीट आरक्षणामधील दलालांचा सुळसुळाट आणि अनधिकृतपणे होणारी तिकीटविक्री रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाद्वारा लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवाशांना सोबत ओळखपत्र ठेवणे सक्तीचे केले आहे. हे ओळखपत्र म्हणजे तुमचं फोटो आयडी असायला हवा. म्हणजेच ज्यावर तुमचा फोटो आहे असं ओळखपत्र... पासपोर्ट, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायन्सस, मतदान ओळखपत्र, पेन्शन पे ऑर्डर, फोटोसहित रेशनकार्ड, ज्येष्ठ नागरिक कार्ड, बीपीएल कार्ड, शाळा-कॉलेजचे ओळखपत्र, फोटो असलेले बँकेचे पासबुक, लॅमिनेटेड क्रेडिट कार्ड, आधारकार्ड यापैंकी कोणतंही एक ओळखपत्र आता तुम्हाला आपल्याजवळ बाळगावं लागेल.
तिकीट असेल आणि ओळखपत्र नसेल तर त्या प्रवाशाकडून विनातिकीट प्रवाशांकडून वसूल केला जाणारा दंड वसूल केला जाईल.