नवी दिल्ली: माजी केंद्रीय मंत्री शशी थरुर यांची त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या रहस्यमयी मृत्यूबाबात पुन्हा एकदा चौकशी होण्याची शक्यता दिल्ली पोलीस प्रमुख बी.एस. बस्सी यांनी व्यक्त केली आहे.
याआधी झालेल्या चौकशीदरम्यान थरुर यांनी पोलिसांना सहकार्य केल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच पोलिसांचा उद्देश सत्यापर्यंत पोहचणं हा असून त्यासाठी या प्रकरणाशी जुळलेल्या प्रत्येक पैलूचा विचार केला जाईल, असंही ते म्हणाले. त्यांना पुन्हा एकदोन दिवसात चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे.
एक दिवस आधी झालेल्या चौकशीत थरुर यांच्याकडे आम्ही त्यांच्या पार्श्वभूमिबाबत चौकशी केली. तसंच त्या दिवशी काय झालं याबाबत विचारणा केली.
प्रसिद्धी माध्यमात जे वृत्त प्रसिद्ध झालं त्यामुळं काही प्रश्न निर्माण झाले होते आणि त्याबाबत आम्ही त्यांच्याकडे माहिती मागितली, असं बस्सी यांनी सांगितलं. थरुर यांच्याकडे सोमवारी रात्री ८ ते मध्यरात्रीपर्यंत चौकशी करण्यात आली. थरुर यांच्यासोबत स्पष्टवक्तेपणानं विचारणा करण्यात आली.
घटना घडली त्या दिवशी नेमकं काय झालं याचा आम्ही शोध घेत आहोत. मात्र आताच त्याचा निष्कर्ष सांगता येणार नाही, असंही बस्सी यांनी स्पष्ट केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.