www.24taas.com, नवी दिल्ली
भाजपच्या अध्यक्षपदी राजनाथ सिंह यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. भाजपच्या संसदीय दलाची बैठक झाली, या बैठकीत राजनाथ सिंह यांच्या नावावर एकमत झाल्याचं समजतंय.
पक्षाकडून याबाबत अद्याप औपचारिक घोषणा झालेली नसली, तरी सिंह यांचं नाव नक्की झाल्याचं मानलं जातंय. थोड्याच वेळात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होईल. यावेळी चित्र अधिक स्पष्ट होऊ शकेल. भाजप अध्यक्षपदासाठी होणा-या आजच्या निवडणुकीत एकच अर्ज आल्यास दुपारी सव्वाबाराच्या सुमारास नावाची घोषणा होईल, असं निवडणुक अधिकारी थावरचंद गेहलोत यांनी सांगितलंय. दरम्यान, संसदीय दलाच्या बैठकीत नितीन गडकरी यांचे आभार मानण्यात आले, इतकंच पक्षाचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी म्हटलंय.
दरम्यान, मंगळवारी भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा देत असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. त्यानंतर गडकरींच्या जागेवर राजनाथ सिंह यांची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता निर्माण झालीय.