नवी दिल्ली: भाव गडगडल्यानं अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारनं हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्र सरकारनं 15 लाख टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाफेडच्या माध्यमातून ही खरेदी करणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न व नागरीपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी लोकसभेत दिली आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा देशात कांद्याचं विक्रमी उत्पादन झालं आहे. गेल्या वर्षी 190 लाख टन कांद्याचं उत्पादन झालं होतं. मात्र यावर्षी हे उत्पादन तब्बल 203 लाख टनांपर्यंत पोहचलंय. त्यामुळे कांद्याचे भाव गडगडले असून शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे दिलासा देण्यासाठी केंद्रानं कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे.