www.24taas.com, नवी दिल्ली
आपल्या वाचाळतेसाठी प्रसिद्ध असलेल्या काँग्रेसच्या दिग्विजय सिंग यांनी पुन्हा एकदा बेताल वक्तव्य करून वाद ओढावून घेतलाय. दिग्विजय सिंग यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना गावठी संडासाशी केली आहे. देशाच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर शौचालयांची गरज असल्याचं सांगत दिग्गीराजांनी यावर कडी करत शौचालयांना `रुरल स्वदेशी संडास` म्हणजेच `आरएसएस` हे नाव द्यावं अशी सूचना दिली आहे.
ट्विटरवर आपले विचार मांडताना दिग्विजय सिंग यांनी लिहिलं की, ‘भारतात आजही ७०% लोक सकाळी शेतात शौचालयाला बसतात. त्यासाठी सरकारने शौचालयांची व्यवस्था करावी. या शौचालयांना ‘रुरल स्वदेशी संडास‘ (आरएसएस) असं नाव द्यावं. शहरांतही अशा शौचलयांची गरज आहे. सरकारी योजनेतून निर्माण झालेल्या शोचालयांना `राष्ट्रीय स्वच्छता शौचालय` म्हणजे पुन्हा `आरएसएस` हे नाव द्यावं.’ दिग्गी राजांनी आपलं मत मांडलं आहे.
यावर कुणी आक्षेप घेण्याचं कारण नसावं, असंही दिग्विजय सिंग यांना वाटतंय. ‘जे लोक या नावांमधून चुकीचा अर्थ काढतात, त्यांचे विचारच खराब आहेत.’ असंही दिग्विजय सिंग यांनी स्वतःच सांगून टाकलंय. आधीच काँग्रेस सरकारने ट्विटरवरून संघाच्या नेत्यांची खाती ब्लॉक केली आहेत. त्यात दिग्विजय सिंग यांनी ट्विटरवरूनच अशा प्रकारचं वक्तव्य करून भाजपची खोडी काढली आहे. ‘रुरल स्वदेशी संडास’ला ‘ग्रामीण स्वदेशी संडास’ हे नाव देखील देता आले असते. मात्र असं बेताल वक्तव्य करून दिग्विजय सिंग यांनी पुन्हा आपलं हसं करून घेतलं आहे. याची किंमत काँग्रेसलाही मोजावी लागेल, अशी चिन्हं दिसत आहेत.