शिवसेना-भाजपामधील वादावर समन्वय समितीची बैठक

सत्तेत एकत्र आल्यानंतर सुरू झालेले वाद आणि कुरबुरी मिटवण्यासाठी शिवसेना-भाजपाच्या समन्वय समितीची पहिली बैठक उद्या होत आहे. हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असले तरी दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेत आहेत. 

Updated: Feb 23, 2015, 04:57 PM IST
शिवसेना-भाजपामधील वादावर समन्वय समितीची बैठक title=

मुंबई : सत्तेत एकत्र आल्यानंतर सुरू झालेले वाद आणि कुरबुरी मिटवण्यासाठी शिवसेना-भाजपाच्या समन्वय समितीची पहिली बैठक उद्या होत आहे. हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र असले तरी दोन्ही पक्षांमध्ये तीव्र मतभेत आहेत. 

भाजपाकडून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या खात्यात हस्तक्षेप होतोय, तर दुसरीकडे भाजपाच्या मंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना अधिकारच दिलेले नाहीत. दुसरीकडे शिवसेनेकडून संधी मिळेल तेव्हा भाजपावर टीका केली जातेय. या पार्श्वभूमीवर समन्वय समितीत या दोन्ही पक्षांचे वाद मिटतात का याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे.

राष्ट्रवादीच्या बाहेरून पाठिंच्या जीवावर तरलेल्या सरकारवर लोकांमधून तीव्र टीका होऊ लागली आणि भाजपाने नाईलाजाने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतले. सत्तेत सहभागी होण्यापासूनच भाजपाने नेहमीच शिवसेनेला दाबण्याचा आणि कमी महत्त्व देण्याचा प्रयत्न केला. 

शिवसेनेने मागितलेले एकही खाते त्यांना मिळाले नाही. दुसरीकडे जी मंत्रीपदे मिळाली त्यातही भाजपाचा आणि मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप सुरू झाला. इथूनच सुरू झाली शिवसेना-भाजपामध्ये वादाला सुरुवात..

शिवसेना-भाजपामधील वादाचे मुद्दे

१) पर्यावरण खाते शिवसेनेच्या रामदास कदम यांच्याकडे असताना नदी नियंत्रण क्षेत्र रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी परस्पर घेतला.

२) उद्योग खाते शिवसेनेचे सुभाष देसाई यांच्याकडे असताना उद्योगासंदर्भातील बहुतेक महत्त्वाच्या बैठका आणि मुख्यमंत्र्यांकडून

३) भाजपाच्या कॅबिनेट मंत्र्यांकडून शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांना अधिकाराचे वाटप नाही

४) दिल्ली विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरेंकडून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका

५) सामनातून वारंवार भाजपावर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका

६) भाजपा नेत्यांकडून विशेषतः प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि एकनाथ खडसेंकडून शिवसेनेवर टीका

या सगळ्या वादाच्या मुद्यावर शिवसेना-भाजपाच्या समन्वय समितीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.

याशिवाय सरकारमधील समित्या आणि महामंडळांवरील नियुक्त्याही रखडल्या आहेत. त्या मार्गी लावण्याचाही प्रयत्न समन्वय समितीच्या बैठकीत होणार आहे. सरकारमध्ये ज्याप्रमाणे वाटप झाले, तोच फॉर्म्युला महामंडळांच्या नियुक्त्यांमध्ये असावा असा भाजपाचा सध्या आग्रह आहे.

एकूण महामंडळाच्या ६० टक्के महामंडळे भाजपाकडे, ३० टक्के शिवसेनेला आणि १० टक्के इतर मित्रपक्षांना अशा पद्धतीने वाटप व्हावे असे भाजपाचे म्हणणे आहे.

प्रमुख महामंडळ वाटपावरूनही शिवसेना-भाजपामध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे. सिडको, म्हाडा, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, एस.टी. अशा प्रमुख महामंडळावरून दोन्ही पक्षात रस्सीखेच होण्याची चिन्हे आहेत. 

खरं तर विधानसभा निवडणुकीच्या आधी युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर जहरी टीका केली होती. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या नेत्यांची मनं प्रचंड दुखावली आहेत. ही मनं साधण्यासाठी आता समन्वयाचा तोडगा काढण्याचा प्रयत्न होतोय.

समन्वय समितीच्या बैठकीच्या आदल्या दिवशीच शिवसेनेने सामनामधून पुन्हा एकदा भाजपाला आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलं आहे. वारंवार होणाऱ्या या टीकेमुळे भाजपाचे नेतेही संतप्त झाले आहेत. समन्वय समितीच्या बैठकीत तरी दोन्ही पक्षातील हे वाद मिटून युतीचा संसार पुन्हा सुखाने चालणार का हा खरा प्रश्न आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.