नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील(जेएनयू) विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार याला देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलाय.
कन्हैय्या कुमार याच्या जामीन अर्जावरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कन्हैय्याने जामिनासाठी उच्च न्यायालयात जावे, असे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. पतियाळा कोर्टान वकिलांच्या मारहाणीनंतर कन्हैय्याने जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती.
खालच्या न्यायालयात न्याय मिळण्याची अपेक्षा नसून जीवाला धोका असल्याचे कन्हैय्याने आपल्या याचिकेत नमूद केले होते. मात्र, कन्हैय्याच्या याचिकेवर सुनावणी देण्यास सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे नकार दिला. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने कन्हैय्या आणि त्याच्या वकिलांच्या सुरक्षेचे आदेश सरकारला यावेळी दिलेत.