नवी दिल्ली : डान्सबारमध्ये सीसीटीव्ही लावण्याची अट सर्वोच्च न्यायालयाने काढून टाकण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. तसेच १५ मार्चपर्यंत अटीपूर्ण करणाऱ्या डान्सबार्सना लायसन्स देण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
यापूर्वी राज्य सरकारने डान्सबारचे लायसन्स देण्याआधी काही अटींची पूर्तता करणे अनिवार्य केले होते, त्यातील डान्सबार चालकांना सर्वात जाचक अट ही डान्सबारमध्ये सीसीटीव्ही लावण्याची वाटत होती, नेमकी ती अट न्यायालयाने वैयक्तिक स्वांतत्र्याचा भंग असल्याचं सांगून, सीसीटीव्हीची अट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.
डान्सबारमध्ये बारबाला आणि ग्राहक यांच्यात सीसीटीव्हीची नजर असेल, त्या सीसीटीव्हीची लाईव्ह दृश्य जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिसतील, डान्सबारमधील गैरप्रकार, आरोपींची सहज ओळख पटावी तसेच बारबालांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ही अट ठेवण्यात आली होती. ती अट सर्वोच्च न्यायालयाने वैयक्तिक स्वातंत्र्याचा भंग असल्याचं सांगून रद्द करण्यास सांगितले आहे. डान्स बार आणि रेस्टॉरंट असोसिएशनने ही याचिका दाखल केली होती.