www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
उद्धव ठाकरे यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत आधी निर्णय होऊ द्या. मग आम्ही आमची भूमिका मांडू असं ठाकरे म्हणाले.
ब-याच दिवसानंतर दिल्ली दौ-यावर गेलेल्या उद्धव ठाकरेंनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्याच. शिवाय असोचेम इंडिया या उद्योजकांच्या संमेलनात चक्क हिंदीमधून भाषण करून राष्ट्रीय राजकारणावर आपली छाप पाडण्याची तयारी त्यांनी सुरू केलीय. यापुढे `मुंबई-दिल्ली कॉरीडोर`चा वापर करू असं सांगत त्यांनी पुढची राजकीय वाटचाल स्पष्ट केली.
दिल्ली दौ-यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली. या भेटीचा तपशील देण्यास मात्र त्यांनी नकार दिला. तत्पुर्वी युवकांशी झालेल्या वार्तालापामध्ये नरेंद्र मोदींचं नाव पंतप्रधानपदासाठी थेट घेण्याचं उद्धव ठाकरेंनी टाळलं. त्यांच्या आधीच्या भाषणाचा धागा पकडून मोदी तुम्हाला भरवशाचा चेहरा वाटत नाही का, असा प्रश्न एका तरुणानं केला. त्यावर खूप चेहरे आहेत, राजनाथ सिंग आणि मी बसून नंतर निर्णय घेऊ, इतकंच ते म्हणाले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.