नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार होणारे दहशतवादी हल्ले थांबवण्यासाठी भारत सरकारनं अद्ययावत टेक्नोलॉजी वापरण्याचा निर्णय घेतला आहे. इस्राईलप्रमाणे भारताच्या सीमारेषेवर ऑपरेशन चक्रव्यूह राबवण्यात येणार आहे. सीमारेषेवर आता अंडर वॉटर आणि अंडर ग्राऊंड सेन्सर लावण्यात येणार आहे. या टेक्नोलॉजीमुळे दहशतवाद्यांना जमीन किंवा पाण्यामार्गे भारतात घुसखोरी करणं मुश्किल होणार आहे.
जुलै महिन्यामध्ये पाकिस्तानला लागून असलेल्या जम्मू-काश्मीर आणि गुजरातच्या सीमेवर हे सेन्सर लावण्यात येणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. पहिल्या फेजमध्ये जम्मू-काश्मीरच्या दोन ठिकाणी हे पायलट प्रोजेक्ट सुरु करण्यात आलं आहे.
या ऑपरेशननुसार सीमारेषेवर प्रत्येक पाच किमी अंतरावर हे सेन्सर बसवण्यात येतील. बीएसएफ यासाठी सुरुवातीला 18 ते 20 कोटी रुपये खर्च करणार आहे. सीमारेषेवर लागणारे हे सेन्सर 360 डिग्री परिसर कव्हर करतील. हे सेन्सर कंट्रोल रुमला माहिती देतील. ही माहिती मिळाल्यानंतर सीमेवर लागलेले कॅमेरे घुसखोरांच्या दिशेने फिरतील.
एवढच नाही तर घुसखोर दिसल्यावरच ऑटोमेटिक बंदुका गोळीबार करून घुसखोरांना ठार करतील, असं हे ऑपरेशन आहे. हे सेन्सर खोल्यांमध्येही असणार आहेत. कोणीही संशयित आल्यावर त्यालाही हा सेन्सर स्कॅन करेल. पाण्यामधला सेन्सरही जमिनीवरच्या सेन्सरप्रमाणेच काम करेल.