www.24taas.com, झी मीडिया, देहरादून
उत्तराखंडच्या गुप्तकाशी, रुद्रप्रयाग, अगस्त्यमुनी आणि फाटा या भागाला पुन्हा एकदा पावसाच्या जोरदार सरींनी विळखा घातलाय. त्यामुळे रविवारी सकाळी बचावकार्याला खोडा घातला. पण, पावसानं विश्रांती घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा बचावकार्यानं वेग घेतलाय.
याच जागेवरून बचावकार्यात व्यस्त असलेली हेलीकॉप्टर्स उड्डान घेत होते. परंतू पावसामुळे त्यांची उड्डाणं थांबवण्यात आली आहेत. देहरादूनमध्येही हेलीकॉप्टर्सची उड्डाणं थांबवण्यात आलीत. हवामान खात्यानं पावसाची शक्यता अगोदरच वर्तविली होती. उत्तराखंडमधून आत्तापर्यंत ८२ हजार जणांना बाहेर काढण्यात आलंय पण अजूनही जवळपास २२ हजार जण इथं अडकून आहेत. सेनादल आणि बचावदलाचे डोळे हवामान पुन्हा सुरळीत होण्याकडे लागलेत. रुद्रप्रयाग, अगस्त्यमुनी आणि गुप्तकाशीशिवाय फाटामध्येही पाऊस अक्षरश: कोसळतोय. त्यामुळे बचावकार्याला खो बसलाय.
चमोली आणि उत्तरकाशीमध्येही पावसाची चिन्हं दिसून येत आहेत. धुक्यानं सगळं आकाश झाकोळून गेलंय. शनिवारीही उत्तराखंडच्या अनेक भागांत जोरदार पाऊस कोसळलाय. पुढचे २४ तास बचावकार्यासाठी खूप महत्त्वाचे समजले जात आहेत.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.