जयललिता यांचे खरे उत्तराधिकारी कोण? अनेक जण स्पर्धेत...

तामिळनाडूच्या झुंजार नेत्या जे. जयललिता मृत्युशी झुंज हारल्या. सध्या सगळा तामिळनाडू, बहुतांश दक्षिण भारत आणि देशातले त्यांचे हजारो चाहते शोकसागरात बुडालेत. मात्र अश्रू आटल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिल. अम्मांनंतर कोण? 

Updated: Dec 6, 2016, 05:13 PM IST
जयललिता यांचे खरे उत्तराधिकारी कोण? अनेक जण स्पर्धेत... title=

चैन्नई : तामिळनाडूच्या झुंजार नेत्या जे. जयललिता मृत्युशी झुंज हारल्या. सध्या सगळा तामिळनाडू, बहुतांश दक्षिण भारत आणि देशातले त्यांचे हजारो चाहते शोकसागरात बुडालेत. मात्र अश्रू आटल्यानंतर त्यांच्या डोळ्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिल. अम्मांनंतर कोण? 

अम्मांच्या मृत्यूची घोषणा करताच त्यांच्या अनुपस्थितीत त्यांची सर्व खाती पाहणारे ओ. पनिरसेल्वम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली, तरी ते अम्मांचे उत्तराधिकारी आहेत, असं मात्र नाही. त्यासाठी अनेक जण स्पर्धेत आहेत. जाणकारांच्या मते यापुढे मुख्यमंत्री आणि पक्षाचा महासचिव एकच व्यक्ती नसेल. अम्मांसोबतच AIADMKमधली ही परंपरा खंडीत होईल. 

मुख्यमंत्री आणि पक्षाच्या नेतृत्वपदासाठी जयललितांचा उत्तराधिकारी होण्यासाठी पक्षात अनेक जण आतुर आहेत. यात अर्थातच पहिले नाव आहे मुख्यमंत्री ओ. पनिरसेल्वम यांचं. अम्मांचा परमभक्त अशीच त्यांची ओळख. जयललिता जेलमध्ये गेल्यावर त्यांना अश्रू अनावर झाले. मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्यानंतर त्यांनाच अम्मांनी मुख्यमंत्री केले. मात्र ते त्या खुर्चीत बसत नसत. अम्मांची खुर्ची रिकामी ठेवत. आताही जयललिता रुग्णालयात असताना त्यांची सर्व खाती पनिरसेल्वम यांनीच सांभाळली होती.  

दुसरं नाव आहे पानरूति रामचंद्रन यांचे.  ७८ वर्षांच्या रामचंद्रन यांनी २०१३ साली सक्रीय राजकारणातून संन्यास घेतला आहे. मात्र त्यांना जयललिताचे कान आणि डोळे म्हटले जाते. अम्मा अपोलो रुग्णालयात असतानाही ते तिथे कायम जात असत. 

लोकसभेचे उपसभापती एम. थम्बीदुरई हे देखील जयललितांच्या वारशाचे प्रबळ दावेदार ठरू शकतात. त्यांच्या योग्यतेवर त्यांचे विरोधकही शंका घेऊ शकत नाहीत. पक्षाच्या राज्यातल्या प्रत्येक निवडणुकीत त्यांचा सक्रीय सहभाग असतो. त्यांचा राजकीय अनुभवही दांडगा आहे. 

शिक्षणानं इंजिनिअर असलेले इडापड्डी पलानीस्वामी सरकारमधले ताकदवान मंत्री आहेत. ५७ वर्षांचे पलानीस्वामी यांच्यामागे गौंडार समाज मोठ्या प्रमाणावर आहे.
 
यशस्वी उद्योजक आणि अण्णा द्रमुकचे प्रवक्ता असलेले के. पांडियाराजन पक्षाचा स्टार चेहरा आहेत. ५७ वर्षाचे पांडियाराजन यांचं इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे. 

जयललितांच्या वासरदारांमध्ये अजित कुमार हे डार्क हॉर्स ठरू शकतात, असं AIADMKमधल्याच काही नेत्यांना वाटत आहे. अम्मांनी आपल्या मृत्युपत्रात उत्तराधिकारी म्हणून दक्षिण भारतीय अभिनेता असलेल्या अजित कुमार यांना निवडल्याची पक्षात चर्चा आहे. मात्र राजकारणात अनुभव नाही, ही त्यांची सर्वात कमकुवत बाजू.

यामध्ये आणखी एक नाव घ्यावं लागेल. जयललिता यांची जुनी मैत्रिण आणि पूर्वाश्रमीची अभिनेत्री शशिकला नटराजन यांच्या पक्षातल्या भूमिकेबाबत गूढ आहे.  जयललिता गेल्या, करूणानिधी रुग्णालयात आहेत, अशा स्थितीत तामिळनाडूमध्ये वरिष्ठ नेतृत्वाची मोठी पोकळी निर्माण झाली.