नवी दिल्ली : स्वत:चे पहिले घर खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. नोटाबंदीनंतर रिअल इस्टेट सेक्टरमध्ये मंदी दिसून येतेय तसेच घरांच्या किंमतीही कमी झाल्यात.
त्यातच आता सरकार पहिली घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना व्याजावर तब्बल २.४ लाख रुपयांपर्यंत सबसिडी देणार आहे. ही सबसिडी केवळ वर्षाला सहा लाख रुपयांपर्यंत उत्त्पन्न असणाऱ्यांना लागू असणार आहे.
सरकारने रिअल इस्टेट मार्केटमध्ये तेजी तसेच २०२२पर्यंत सर्वांना घरे उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सबसिडीचे दोन स्लॅब बनवलेत. ३१ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दोन सबसिडी स्कीम्सची घोषणा केली होती. या योजनेंतर्गत प्रत्येकाच्या उत्पन्नानुसार सबसिडी दिली जाणार आहे.
जर एखाद्या व्यक्तीने ९ टक्के व्याजदराने २० लाख रुपयांचे कर्ज घेतल्यास त्या व्यक्तीला ६ लाख रुपयांच्या कर्जावर केवळ २.५ टक्के व्याजदर द्यावे लागेल. उरलेल्या १४ लाख रुपयांच्या कर्जावर ९ टक्क्याने व्याजदर चुकते करावे लागेल. याप्रमाणे हिशेब केल्यास तब्बल २.४ लाख रुपयांचा फायदा होऊ शकतो.