www.24taas.com , झी मीडिया, ग्रीस
‘अलेक्झांडर द ग्रेट’ म्हणून ओळखला जाणारा ग्रीसचा जगज्जेता सिकंदर याची कबर सापडल्याची बातमी आहे. ग्रीसच्या सांस्कृतिक मंत्रालयानं या वृत्ताला दुजोरा दिलाय. मात्र अथेन्सजवळ सापडलेला चौथ्या शतकातील उंबरठा अलेक्झांडरच्या कबरीशी साधर्म्य दाखवत असला तरी त्याबाबत ठोस पुरावे मिळालेले नाहीत, असंही ग्रीस सरकारनं स्पष्ट केलंय.
सिकंदरानं आपलं साम्राज्य आयोनियन समुद्रापासून हिमालय पर्वतापर्यंत पसरविलं होतं. इसवी सनपूर्व ३०२ मध्ये बॅबिलियॉनमध्ये त्याचा मृत्यू झाला होता. मात्र त्याचा मृतदेह असलेली शवपेटी ग्रीसमधील अनेक राजांनी वेगवेगळ्या ठिकाणी फिरवली. या जगज्जेत्याच्या मृत्यूनंतरचा हा प्रवास संपविला तो, टोलेमी फिलाडेल्फस-२ या राजानं. त्यानं तत्कालीन इजिप्तमधील अलेक्झांड्रीया इथं अलेक्झांडरची स्थायी कबर बांधली आणि मध्ययुगापर्यत ती तिथंच होती. त्यानंतर मात्र अलेक्झांडर द ग्रेटच्या कबरीचा थांगपत्ता कोणालाही कळलेला नाही.
अलेक्झांडर द ग्रेटची कबर सापडल्याच्या वृत्तानं जगभरातील इतिहासतज्ज्ञही सक्रिय झाले आहेत. अॅम्पीफोलिस या प्राचीन ठिकाणाजवळ हा ५०० मीटर लांब आणि तीन मीटर उंचीचा चौथरा आढळून आला आलाय. त्यात राजघराण्यातील एखाद्या मोठ्या व्यक्तीला दफन करण्यात आलं असावं, अशी दाट शक्यता पुरातत्ववेत्यांनी व्यक्त केलीय. या मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या अल्कातेमीनी पेरीस्तीनी यांनीही या कबरीमध्ये `एक अथवा अनेक महत्वाच्या व्यक्तींना दफन करण्यात आलं असू शकतं`, असं म्हटलंय.
त्यामुळं आता ही कबर खरंच जगज्जेत्या सिकंदरची आहे, की इतर कोणाची, याचा शोध हे इतिहासतज्ज्ञ घेत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.